*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
*खासदार प्रणिती शिंदे यांच्या पुढाकाराने, नान्नज माळढोक अभयारण्य आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान, आणि विकासकामांना परवानगी या संदर्भात नान्नज वनविभाग कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न झाली*
नान्नज माळढोक अभयारण्य आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रानडुक्कर, आणि इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची पिके सातत्याने उध्वस्त होत आहेत. शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत असून त्यांना वेळेवर नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या प्रश्नासह वनविभाग संदर्भात इतर अनेक अडचणी सोडविण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नान्नज येथील वन विभाग विश्रामगृह येथे महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीस वनविभागाचे अधिकारी आणि शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोर पीडित शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अनेक प्रश्न मांडले.
१) नान्नज अभयारण्य परिसरातील गावांमध्ये आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना रानडुकरांचा आणि वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यांना नगदी पिके लागवड करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,
२) संपूर्ण नान्नज अभयारण्याला कुंपण व इतर उपाययोजना करून रानडुक्कर व इतर वन्यप्राणी शेतीमध्ये शिरणार यासाठी बंदोबस्त करावा,
३) माळढोक अभयारण्य क्षेत्रामध्ये येत नसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाकरीता वन विभागाच्या वतीने NOC देण्यात यावा.
४) माळढोक अभयारण्यातून जाणारे रस्ते नान्नज – मार्डी – अकोलेकाटी – नान्नजसह इतर ठिकाणच्या रस्ते आणि विकासकामांना NOC वन विभागाच्या वतीने देण्यात यावा.
५) मौजे कोंडी येथील माळढोक पक्षी अभयारण्य आरक्षित व संवेदनशील क्षेत्र वगळण्याकरीता संबंधित महसूल अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी,
६) कोंडी गावातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर वन विभागाची नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना बांधकाम परवाना मिळत नाही, कोणतेही कर्ज मिळत नाही व केंद्र शासनाचा योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे वनविभागाची नोंद रद्द करावी.
७) मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील वनीकरणाचा शेरा कमी करावा,
८) मौजे वाफळे येथील मुस्लिम समाजाकरीता दफनभुमीसाठी वनविभाग गट नं. ७१८/२ मधील ०.४० गुंठे जागा देण्यात यावी.
९) प्रादेशिक वन विभाग सोलापूर विभागात वन व्यवस्थापनामध्ये रोजंदारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे.
१०) मोहोळ तालुक्यातील अरबळी सह अनेक गावात दफनभुमीकरीता वनविभाग चलन भरून घेऊनही NOC देत नाही. विकासकामांसाठी NOC ताबडतोब द्यावी.
११) पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील वनीकरणातून ये-जा करण्याकरीता रस्त्याची परवानगी मिळावे,
१२) पंढरपूर खरसोळी येथील आदिवासी पारधी कुटुंबास वनहक्क पट्टा पध्दतीने कायमस्वरूपी जागा देण्यात यावी,
१३) वन विभागाच्या राखीव जागेमध्ये अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांच्या घरांची मोडतोड करू नये.
१४) डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून कुंपण योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरीता शेतकऱ्यांचे अर्ज भरुन घेण्यात यावे.
१५) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गुरे मरण पावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
१६) काही गावातील अभयारण्य क्षेत्राचा उल्लेख नसल्यामुळे केंद्र शासनाकडुन त्यांना डॉ. शामाप्रसाद मुखर्जी कुंपण योजनेचा लाभ मिळत नाही, तसेच झटका मशीन मिळत नाही. त्यासाठी उपाययोजना करावी,
१७) शेतकऱ्यांची जनावरे अभयारण्यात चुकून घुसले तर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत.
पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मी सतर्कपणे लक्ष ठेवणार आहे. शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल किंवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसेल, तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे हलगर्जीपणा न करता तातडीने उपाययोजना कराव्यात. ज्या ठिकाणी अडचणी येतील, तेथे मी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंबंधी किंवा अन्य अडचणींसंबंधी सर्व तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, अन्यथा मला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी दिला आहे.
यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवारण होण्याकरीता सत्वर कारवाई करण्यात येईल व एक खिडकी योजना राबवून शेतकऱ्यांचे वन विभागाशी निगडीत असणारे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले.
या बैठकीस उपवन संरक्षक कुलराज सिंह, अजित शिंदे, रोहीत गांगुर्डे, प्रदीप कोरे, पुथ्वीराज माने, भारत जाधव, सुलेमान तांबोळी, प्रल्हाद काशिद, मनोज यलगुलवार, जितेंद्र शिलवंत, राजेश पवार, दाजी गोफणे, वैभव घोडके, सुदर्शन अवताडे, सुनिल जाधव, सुवर्णा लामकाने, प्रणिता शिंदे, तात्या कादे, बाळासाहेब नीळ, शुभम शिराळ, शंकर मोरे, पप्पू साखरे, देविदास लामकाने, अंजली क्षीरसागर, दीपक अंधारे, विश्वजित भोसले, शिवाजी आवटे, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज राठोड, युवराज वडजी, अमोल पांढरे, प्रताप टेकाळे, बाबासाहेब पांढरे, भारत बोंगे, सतीश पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा