*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक मनाचा गाभा. हा दिवस म्हणजे केवळ पंचांगातील एक तारीख नाही; तर हा जिवंत स्मृतींचा, स्वप्नांचा, श्रद्धेचा आणि समतेच्या दीपांचा एक उजळलेला संमेलनबिंदू आहे. हा दिवस म्हणजे अविरत चालणाऱ्या लाखो पावलांचा आवाज, ज्यात देव, भक्त, समाज आणि अंतर्यामी स्वत्व यांचे स्वर एकरूप होतात.
वारकरी वारी म्हणजे केवळ एका देवस्थानाची यात्रा नव्हे; ती आहे माणसाच्या अस्मितेचा, अंतरंगाच्या उजळणीचा आणि समतेच्या शोधाचा एक अखंड प्रवास.
हि वारी प्रतिवर्षी नव्याने जन्म घेते—आळंदीच्या किंवा देहूच्या पवित्र भूमीत, पण ज्या क्षणी ती चालते, त्या क्षणी ती प्रत्येकाच्या अंतःकरणात उगम पावते.
वारीच्या प्रवासात जात, धर्म, पंथ, वंश, लिंग यांच्या सगळ्या क्षुद्र भिंती गळून पडतात. टाळ, विणा, मुखात नामघोष आणि मनात विठ्ठल, हीच एक ओळख असते वारकऱ्याची. इथे कुणी राजा नाही, कुणी रंक नाही—सर्वजण "दिंडीतले एक" असतात.
तुकाराम महाराज म्हणतात:
"जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले |
तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ||"
हे केवळ भजनाचे शब्द नाहीत, तर ते मानवी मूल्यांचे अत्युच्च शिखर आहे. इथे देव म्हणजे कुणी दूरवर बसलेला अदृश्य ईश्वर नाही, तर इथे देव आहे—दुःखी, पिडीत, शोषित माणसाच्या डोळ्यात.
वारी म्हणजे चालणं; आणि चालणं म्हणजे परिवर्तन. जिथे संथ पावलांनी चालता चालता मनातले गुंते सुटतात, अंतःकरण पिळून निघतं आणि विवेकाचा नवा प्रकाश फुलतो.
ज्ञानेश्वर माऊली सांगतात:
"अविचाराचा अंधार | निघो जो जेणें ॥" हि वारी त्या अंधःकारातून प्रकाशाकडे जाण्याची साधना आहे.
वारीचा विचार केवळ मराठी माणसापुरता मर्यादित राहत नाही. तिचा स्वर जगभरातील सामाजिक-आध्यात्मिक चळवळींशी सुसंवादी आहे. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांच्या 'I Have a Dream' मधील समानतेची आर्त हाक ही तुकारामांच्या 'सर्वसमावेशकते'ची प्रतिध्वनी आहे. नेल्सन मंडेलांचा रंगभेदविरोधी लढा हे चोखामेळ्यांच्या विद्रोहाचे जागतिक रूप आहे. गांधीजींचं 'सर्वोदय' हे ज्ञानेश्वरीच्या 'विश्वकल्याण' संकल्पनेचं आधुनिक प्रत्यंतर आहे. बुद्धाचा करुणावाद ही वारीच्या करुणाशील हृदयाची जागतिक अभिव्यक्ती आहे. थिच न्हान यांच्या ‘Walking Meditation’ मध्ये वारीचा गाभा प्रतिबिंबित होतो—प्रत्येक पावलात सजगतेचा आणि शांतीचा अनुभव.
वारी म्हणजे ‘स्थान’ नव्हे; ती आहे स्थिती. वारी म्हणजे ‘पर्याय’ नव्हे; ते आहे परिवर्तन. वारी म्हणजे ‘अंधश्रद्धा’ नव्हे; ती आहे अंतःप्रज्ञा.
आजच्या जगात माणूस तुटतो आहे-जातीयतेच्या, धर्मांधतेच्या, आर्थिक विषमतेच्या आणि पर्यावरणीय संकटांच्या गर्तेत. अशा काळात वारीचा विचार नव्याने जागवण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे. चालणं थांबलं की आपण जडावतो, प्रत्येक दुःखात सहभागी झालं की आपण माणूस होतो आणि जन्माला येणं महत्त्वाचं नाही; तर चालणं महत्त्वाचं आहे—आधाराच्या शोधात, सद्गतीच्या दिशेने, हेच वारी आपल्याला शिकवते.
वारी म्हणजे मानवी मूल्यांची पदयात्रा आहे. वारी म्हणजे समतेची अखंड पुकार आहे. वारी म्हणजे माणसाच्या अस्मितेचा गंध हरवलेला असतो, तो पुन्हा सापडण्याची जागा आहे.
वारीचा शेवट पंढरपूरमध्ये होत नाही. पंढरपूर हे केवळ एक भौगोलिक ठिकाण आहे, खरी पंढरी ही मनाच्या गाभ्यात असते. ज्ञानदेव म्हणतात:
"जेथे जातो तेथे तू माझा संगाती |
लोपलासी अंतरीं पंढरी न वाटी ||"
या ओळीत वारीचा खरा अर्थ सामावलेला आहे.
वारी हा 'बाह्य प्रवास' आहे आणि 'अंतःप्रवास' सुद्धा आहे.
वारीत चालणं हे केवळ शरीराचं नसतं, ते असतं—हृदयाचं, विवेकाचं आणि करुणेचं.
माणसाच्या अंतःकरणातील दुभंग मिटवणारा, समतेच्या बीजाला अंकुर देणारा आणि करुणेच्या ओलाव्याने हृदयाला भिजवणारा प्रवास म्हणजे वारी. हा प्रवास—कालातीत आहे, विशाल आहे, मानवी आहे.
वारी चालते आणि आपण चालतो—देवाकडे नव्हे, तर आपल्यातील चांगुलपणाकडे, सौंदर्याकडे, विवेकाकडे.
वारीची ही आर्त चाल थांबता कामा नये. पावलांना थकवा लागू नये.
हृदयातील श्रद्धेची मशाल कधीही विझू नये. कारण विठ्ठल केवळ मंदिरातील दगडात नाही; विठ्ठल आहे—प्रत्येक चालणाऱ्या पावलात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक मनात.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा