इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
गेली ३४ वर्षाच्या अथक प्रयत्नातून जिव्हाळ्या च्या सर्व शक्ती एकत्र करून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर ६०० खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करून इंदापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवले आहे. ते खेळाडू आता आत्मनिर्भर देखील झाले असून आपल्या कुटुंबाची उपजीविका समर्थपणे चालवत आहेत. त्यांना घडविणाऱ्या स्पोर्ट अकॅडमीस आणखी दर्जेदार खेळाडू घडवायचे आहेत. त्यामुळे शासनाने आणखी गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हॉल व प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी वीस गुंठे शासकीय जागा द्यावी अशी मागणी इंदापूर तालुका ज्यूदो कराटे स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कोच दत्तात्रय व्यवहारे यांनी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप
गारटकर, सोनाई दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने, संचालक प्रवीण माने यांच्यासह सर्व पक्षाच्या नेत्यांनी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तालुक्यातील गुणवंत खेळाडूंना मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी श्री. व्यवहारे यांनी स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून
गेली ३४ वर्षात अफाट खर्च केला आहे. मात्र त्यांना आणखी खेळाडू घडवायचे असून त्यासाठी त्यांनी शासनाकडे २० गुंठे जागेची मागणी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केली आहे. त्यांच्या स्पोर्ट अकॅडमीने सुमारे ६०० खेळांडूंना पोलीस खाते, राज्य राखीव दल, सैन्य दलात जाण्याची व २०० जणांना शासकीय नोकरीची संधी मिळवून दिल्याने त्यांची कुटुंबे अर्थ स्वावलंबी झाले आहेत. इंदापूर तालुका ज्यूदो कराटे स्पोर्ट अकॅडमीच्या कार्याची दखल अद्याप शासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेऊन त्यांना लोकप्रतिनिधींनी आर्थिक सहकार्य करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे गरजेचे आहे.
इंदापूर तालुक्यातील नव्या पिढ्यांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हॉल व प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्याचे ॲकॅडमीचे स्वप्न आहे. त्यासाठी शासनाने २० गुंठे शासकीय जागा द्यावी अशी त्यांची माफक अपेक्षा आहे.
यासंदर्भात इंदापूर तालुका ज्यूदो कराटे स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच दत्तात्रय व्यवहारे म्हणाले, सन १९९८ मध्ये ज्यूदो हा क्रीडा प्रकार इंदापूर मध्ये चालू केला. त्याच्या सरावा साठी औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये असोसिएशन व विद्यापीठ स्पर्धेमध्ये खेळाडूंना खेळवले. काही खेळाडू विद्यापीठांच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळले. त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्याची दखल
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका ज्यूदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ क्लब या संस्थाची स्थापना केली. सुरुवातीला ज्यूदोसाठी आवश्यक असणारा मॅट नसल्याने खूप गैरसोय झाली. भरत शहा व श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहा सांस्कृतिक भवन येथे सराव घेण्यास सुरुवात केली. तिथे गेली २२ वर्षे तेथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर वर्ग भरवले. त्यातून बरेचसे खेळाडू तयार झाले. राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या खेळाडूंना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असल्याने बऱ्याच मुलांना त्याचा फायदा झाला.पालकांना
हे लक्षात आल्यानंतर खेळाडूंची संख्या वाढू लागली. रोज जवळपास १५० ते २०० खेळाडू सरावासाठी येऊ लागले. त्या वेळेस आपण स्वतः वैयक्तिक पहिला एक मॅट एरिया घेतला. आता तीन मॅट एरिया आहेत. त्यासाठी २० लाख रुपये आपण आपल्या खिशातून खर्च केले आहेत. सध्या ८० मुली व ६० मुले नियमित सरावासाठी येतात. आत्तापर्यंत असंख्य राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. खेलो इंडिया व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील पदके मिळवून त्यांनी राज्य व देशांमध्ये इंदापूर शहरास नावलौकिक मिळवून दिला आहे. या संपूर्ण कार्यकाळात शहा हेल्थ क्लबने सरावासाठी मोफत जागा उपलब्ध करुन दिली. प्रत्येक उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या वेळी मुलांना मोफत ट्रॅक सूट,समारोप प्रसंगी पालकांसह स्नेह भोजन व खेळाडूंचा सन्मान करण्याची परंपरा निर्माण केली आहे. मात्र शासनाने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्याची यथोचित दखल देखील घेतली नसल्याची श्री. व्यवहारे यांची खंत आहे. विशेष म्हणजे श्री. व्यवहारे यांची पत्नी, मुलगा व मुलगी यांनी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करून देशाचा नावलौकिक उंचावला आहे.
दत्तात्रय व्यवहारे हे स्वतः उत्तम खेळाडू असून गेल्या ३४ वर्षांपासून ते ज्युदो, तायक्वांदो क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. सन १९९१ मध्ये त्यांनी तायक्वांदोला सुरुवात केली. सन १९९४ ला ब्लॅक बेल्ट मिळवला. इंदापूर तालुक्यातील पळसदेव, भिगवण, वालचंदनगर इतर भागांमध्ये क्लासेस चालू केले. सन १९९८ मध्ये ज्यूदो हा क्रीडा प्रकार चालू केला. या सर्वांबरोबर मागील काही काळापासून कुराश क्रीडा प्रकाराशी ते जोडले गेले आहेत. त्यांच्या खेळाडूंनी ज्यूदो,
तायक्वांदो तसेच कुराश या खेळात आंतरराष्ट्रीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी शासनाने त्यांची २० गुंठे जागेची मागणी मान्य करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांचे शिष्य तसेच शहा हेल्थ क्लबचे विश्वस्त अंगद शहा यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा