*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
----- : महाराष्ट्राचे नवे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यामुळे तब्बल 30 वर्षांच्या खंडानंतर पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राचे कृषीमंत्रीपद मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शशिकांत सुतार यांच्यानंतर कृषीमंत्रीपदी नियुक्ती झालेले दत्तात्रेय भरणे पुणे जिल्ह्यातील तिसरे नेते ठरले आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेतून कृषीमंत्री झालेले भरणे हे राज्यातील चौथे तर, सलग तिसरे नेते ठरले आहेत.
अधिवेशन काळात विधानसभेत ऑनलाइन रमी खेळत असल्याचा आरोप झालेले तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे अखेर गुरुवारी (दि.31 जुलै) कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भरणे यांच्याकडील क्रीडा खाते आता कोकाटे यांना देण्यात आले आहे. यामुळे कोकाटे आणि भरणे यांच्या खात्यांची अदलाबदल झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार यांची दि. 21 फेब्रुवारी 1975 रोजी राज्य मंत्रिमंडळात कृषीमंत्री म्हणून निवड झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी शरद पवार यांच्याकडे राज्याच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. त्यावेळी शरद पवार यांना दोन वर्षे एक महिना 25 दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता. त्यानंतर पुढे शरद पवार यांनी देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी प्रदीर्घ काळ सांभाळली आहे. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार हे सलग दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री होते. दरम्यान, शरद पवार यांच्यानंतर पुणे शहरातील आमदार शशिकांत सुतार यांची सन 1995 मध्ये कृषीमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. सुतार हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री होते.
जिल्हा परिषद पदाधिकारी ते कृषीमंत्रीपदी निवड झालेल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे, पुणे जिल्ह्यातील दत्तात्रेय भरणे आणि बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे या चार नेत्यांचा समावेश आहे. भुसे व कोकाटे हे दोन्ही नेते नाशिक जिल्हा परिषदेचे, भरणे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. दादा भुसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दि. 30 डिसेंबर 2019 ते दि. 27 जून 2022 या कालखंडात कृषीमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. भुसे यांच्यानंतर काही काळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर, काही काळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अब्दुल सत्तार यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती.
राज्य मंत्रिमंडळात सन 2023 पासून आजतागायत सलग तीन झेडपीतील नेत्यांची कृषीमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय मुंडे (दि.2 जुलै 2023 ते दि. 5 डिसेंबर 2024), नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव कोकाटे (दि. 15 डिसेंबर 2024 ते दि. 31 जुलै 2025) आणि आता पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय भरणे (दि. 31 जुलै 2025 पासून) आदींचा समावेश आहे.
दरम्यान, भरणे हे सन 2012 ते 2014 या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या भरणे यांची 20 मार्च 2012 रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. पुढे ते 20 सप्टेंबर 2014 पर्यंत पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. भरणे हे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मंत्री म्हणून ओळखले जातात.
राज्याचे नवे कृषीमंत्री भरणे यांची राजकीय कारकीर्द ही सहकार क्षेत्रातून झाली आहे. यानुसार ते सन 1996 मध्ये पहिल्यांदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) संचालक म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजतागायत ते जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. दरम्यान सन 2002 ते 2007 या कालावधीत ते जिल्हा बँकेचे अध्यक्षही होते.
शेतकऱ्यांचा मुलाला राज्याचे कृषीमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने त्याला योग्य तो न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नुतन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना दिली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा