इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
राज्य सरकारच्या प्रस्तावित सी प्लेन सेवेमध्ये उजनी धरणाचा समावेश करुन उजनी जलाशय ते खडकवासला जलाशय मार्ग अशी सेवा सुरु करून इंदापूरच्या कृषी धवल क्रांतीस चालना द्यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुल तेरखेडकर यांनी केली आहे.
श्री. तेरखेडकर म्हणाले,इंदापूर तालुका हा नीरा भीमा नद्यांच्या खोऱ्यात वसला असून तालुक्यात लोणी देवकर येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. वालचंदनगर येथील १०० वर्षापासून जुनी असलेली कारखानदारी, जंक्शन येथील नियोजनबध्द विकसित होत असलेली लघु औद्योगिक वसाहत, भिगवण येथील आंतरराष्ट्रीय कागद प्रकल्प, गोखळी येथील आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त सोनाई दूध व दुग्ध पूरक प्रकल्प, उजनी जलाशयावर पाणलोट क्षेत्रात वाढत चाललेली फळ शेती, तालुक्यातील साखर कारखानदारी व इतर पुरक प्रकल्प यामुळे ही सेवा तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे. नोव्हेंबर २०२० पासून आपला या मागणीचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. यासंदर्भात विविध वर्तमानपत्रांमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचा शासन दरबारी पाठपुरावा होऊन त्याचे प्राथमिक सर्वेक्षण देखील झाले. तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पुनर्वसित मौजे कालठण नंबर एक च्या हद्दीत हा प्रकल्प होणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र शासनाने उजनी ऐवजी इतर धरणांना प्राधान्य दिले. महाराष्ट्रात गंगापूर धरण (नाशिक), धोम धरण ( सातारा ), खिंडशी व पेंच धरण ( नागपूर ), पवना धरण ( पुणे ), कोराडी धरण ( बुलढाणा ) व गणपती पुळे ( रत्नागिरी ) व रत्नागिरी येथील धरण परिसरात शासनाने सी प्लेन योजना राबविण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामध्ये उजनी धरणाचा देखील समावेश करावा अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील चिंकारा हरिण पर्यटन केंद्र, तालुक्यातील नीरा भीमा संगमावर असलेले एकमेव तीर्थक्षेत्र पर्यटन केंद्र श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर, पंढरपूर, अक्कलकोट, मोरगाव, दहिगाव येथील धार्मिक पर्यटनासाठी उजनी धरण क्षेत्रात सी प्लेनची व्यवस्था केल्यास त्यास चांगला प्रतिसाद मिळेल. यामुळे पुणे, सोलापूर, अहिल्यानगर हे जिल्हे पुन्हा जोडले जातील. इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये कृषी पर्यटन वाढून त्या गावातील शेतकऱ्यांना,त्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. निर्यातक्षम शेतीमालास परदेशी बाजारपेठ मिळून व्यापार उदीम वाढेल. लोणी देवकर, बारामती औद्योगिक वसाहती मधील मालास चांगली बाजारपेठ मिळेल. उजनी धरणातील मासे परदेशी जातील. विविध उद्योगा तील उद्योजकांना किंवा त्यांच्या ग्राहकांना पुणे मुंबई येथून सी प्लेनने थेट इंदापूर तालुक्यात उजनी धरण क्षेत्रात ये जा करता येईल. त्यामुळे इंदापूर तालुक्याचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार व्हावा अशी मागणी तेरखेडकर यांनी केली आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई दूध संघाचे संस्थापक दशरथ माने, संचालक प्रवीण माने, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शेठ यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन याचा पाठपुरावा केल्यास इंदापूर तालुक्याला निश्चित अच्छे दिन येतील असा विश्वास युवा पिढीने व्यक्त केला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा