कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- उजनी धरणातून भीमा नदीतील पाणी ९० हजार क्युसेक्सने कमी करून ६० हजार क्युसेक्स करण्यात आले. त्यामुळे गणेशवाडी - गारअकोले पुल तिन दिवसानंतर वाहतूकीसाठी खुला होणार आहे. तर शेतातील पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस पडेना पुराच्या पाण्याने पिकांना पाणी देता येईना पिके जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
उजनी धरणातून भिमा नदीत मागील चार दिवसांपासून पुरनियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात होते. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर व माढा तालुक्यातील गावातील शेतातील उभ्या पिकात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये ऊस, केळी, मकवान, पेरू, डाळींब पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तर नरसिंहपूरसह पंढरपूर मोठी पुरपरस्थिती निर्माण झाली होती.
पावसाने मागील तीन महिन्यांपासून दांडी मारली आहे. तर पुणे परिसरातील धरणातील पाण्यामुळे भिमा नदीला पुरपरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी नदी काठावरील मोटारी, पाईप, स्टार्टर, केबल व फ्युज पेट्या काढून सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. नदीतील लाखो लिटर पाणी वाहून जाताना व पिके जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. "आई खाऊ देईना, बाप रडू देईना" अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांचे फ्युज पेट्या, पाईप, स्टार्टर व केबल नदीतील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यातच राहीले. त्यापैकी बरेच वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी अडकून राहिले असूनही त्याची दुरुस्ती करावी लागण्याची शक्यता आहे.
भिमा नदी काठावरील इंदापूर व माढा तालुक्यातील शेती, शेतातील उभी पिके, शेती साहित्याचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केशव बोडके, नंदकुमार शिंदे, अशोक बोडके, शशिकांत सुर्यवंशी, रणधीर मोहिते, प्रताप मोहिते, फणिंद्र कांबळे आदिंनी केली आहे.
फोटो - गणेशवाडी येथील भिमा नदी काठावरील पिकात पुराचे पाणी घुसले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा