इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा घेत असताना अतिक्रमण हटवण्या साठी गेलेल्या प्रशासना बरोबर अतिक्रमण धारकांची वादावादी झाली. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करण्यात आली तर मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुल उद्धव शिंदे ( वय ४०, ग्राम महसूल अधिकारी, बाभूळगाव ) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पाच जणांसह इतर दहा ते पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी २.० हा प्रकल्प बाभूळगाव ( ता. इंदापूर) येथील गायरान गट क्र. ३४२/१ येथे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे काम आवादा कंपनी करत आहे. या ठिकाणी अतिक्रमण केलेले ७ ते ८ पत्राशेड आहेत. हे अतिक्रमण काढण्याकरिता यापूर्वी नोटीस बजावत शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी हे तहसीलदार जीवन बनसोडे, निवासी नायब तहसीलदार स्वाती राऊत, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, इंदापूरचे मंडळ अधिकारी अशोक पोळ, कालठाण नं २ ग्राम महसूल अधिकारी वैभव मुळे, हिंगणगावचे महसूल सेवक सुधीर पाडुळे यांच्यासह फिर्यादी, आजूबाजूचे गावचे पोलिस पाटील तसेच इंदापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, आवादा कंपनीचे सर्व कर्मचारी गेले होते. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढत असताना या वस्तीवरील नागरिकांनी जेसीबीच्या समोर उभे राहून आरडाओरडा करून काम बंद पाडले.
त्यानंतर रज्या चौवटया काळे याने फिर्यादीच्या हाताला धरून त्यास जमावामध्ये ढकलले. त्यावेळी एका महिलेने कॉलरला धरून फिर्यादीच्या गालात चापट मारली तसेच शेषराव चैन्या काळे व दोन महिलांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांचे अंगावर धावत जात त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीनी मंडळ अधिकारी अशोक पोळ यांच्यावर देखील दगडफेक केली. त्यामुळे त्यांच्या हाताच्या दोन्ही कोपऱ्याला जखम झाली असून पाठीवर दगडाच्या मारामुळे मुका मार लागला आहे.
यावरून रज्या चौवट्या काळे, शेषराव चैन्या काळे, सचित्र्या वाफ्या पवार ( सर्व रा. बाभूळगाव ), दोन महिलांसह अन्य दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असताना देखील भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना घरापासून वंचित ठेवले जाते, त्यांची घरे पाडण्यात आली तर ज्यांनी या भागात मोठी अतिक्रमणे करून घरे बांधली आहेत, ते अतिक्रमणे करून देखील बारमाही पिके घेत आहेत, त्यांची अतिक्रमणे प्रशासना कडून हटविण्यात येत नाहीत, असा आरोप करत अतिक्रमण धारकांनी प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध केला. ही जमीन कंपनीस देण्याऐवजी येथे आम्हाला कायमची जागा घरांसाठी द्यावी अशी मागणी यावेळी महिलांच्या वतीने करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा