Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५

सोलापूर जिल्ह्यात ४ हजार जणांकडे स्वतःच्या बंदुका!--वैयक्तिक शस्त्र परवाण्यावर पोलिसांचे निर्बंध-- या लोकांनाच शस्त्र परवाना --वर्षात कोणालाही नाही परवाना!...


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

सोलापूर : जिवाला धोका असलेल्या किंवा मोठ्या व्यावसायिकास जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्त शस्त्र परवाना देतात. पण, अनेकांनी वशिलेबाजी करून यापूर्वी हौस, मौज म्हणून शस्त्र परवान्यावर बंदुका घेतल्या आहेत. बीडच्या घटनेनंतर गृह विभागाने शस्त्र परवान्यावर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागील १२ महिन्यांत जवळपास २१ जणांनी (दरमहा एक ते दोन अर्ज) शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेले असताना देखील त्यातील एकालाही शस्त्र परवाना दिलेला नाही.


मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार ४७२ जणांकडे शस्त्र परवाने होते. सोलापूर शहरातील साडेपाचशे जणांकडे देखील परवान्याची शस्त्रे आहेत. ग्रामीणमध्ये पंढरपूर (७४४), अक्कलकोट (७२०), सांगोला (७०४), माळशिरस (६८९) या तालुक्यात सर्वाधिक शस्त्र परवानाधारक आहेत. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच जिल्ह्यातील ज्यांना शस्त्रांची आवश्यकता नाही, त्यांची यादी पोलिस ठाण्यांकडून मागवून घेतली. त्यांचे परवाने रद्दचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून परवाने रद्द केले.


अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल होते, शस्त्राचा गैरवापर केला होता, काहींचा मृत्यू झाला होता तर काहींचे वय ७२ वर्षांवर होते. आता सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणमधील चार हजार व्यक्तींकडे परवाना असलेल्या बंदुका आहेत. त्यातील दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण न करणारे, मयत, वृद्ध, गुन्हा दाखल झालेल्यांकडील शस्त्र काढून घेतले जाणार आहेत.


परवाना कोणाला मिळतो?


ज्या व्यक्तीला स्वतःच्या जिवाला धोका आहे, असे वाटते आणि ही गोष्ट तो सिद्ध करू शकतो, अशा व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी परवाना मिळतो. योग्य कारण असणाऱ्या व्यक्तींनाच परवाना दिला जातो. शस्त्र कायदा, १९५९ नुसार परवाना देण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांना अधिकार आहेत. ग्रामीणमधील अर्ज पोलिस अधीक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात.


७२ वर्षांवरील व्यक्तींना मिळत नाही परवाना


शस्त्र परवान्याची ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांच्या जिवाला धोका आहे, त्यांनाच परवाना दिला जातो. शस्त्र परवान्यासाठी दरमहा सोलापूर ग्रामीणमधील पोलिस ठाण्यांकडून एक-दोन अर्ज येतात; पण त्यातील कोणालाही परवाना दिला नाही. १८ ते ७२ वर्षातील व्यक्तींना शस्त्र परवाना दिला जातो. ७२ वर्षांवरील व्यक्तींना परवाना दिला जात नाही.-नामदेव शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विशेष शाखा, सोलापूर ग्रामीण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा