इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
इंदापूर तालुक्यात सुमारे १७ हजार बोगस मतदार असल्याचा दावा निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व निरनिमगाव गावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील पत्रकार परिषदेत केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खळबळ उडाली.
बोगस मतदारांमध्ये परराज्य, बाहेरगाव व अल्पवयीन मतदारांचा समावेश असल्याचा त्यांचा दावा त्यांनी सत्यप्रतींमध्ये बोगस मतदारांबाबतचे पुरावे सादर केल्याने खळबळ उडाली. आपल्या निरनिमगाव या छोट्या गावात देखील २२० बोगस मतदार आढळून आल्याचे पाटील यांचे म्हणणे असून या बोगस मतदारांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांत मतदान केल्याचे पुरावे त्यांनी समोर ठेवले आहेत.
निरनिमगाव मतदार यादीत माण ( जि. सातारा ) तालुक्यातील वरकुटे व मलवडी येथील २४, इंदापूर तालुक्यातील कळंब येथील २८, कालठण नं. १ येथील ६, बोरी येथील १, आटपाडी येथील ३, कोंडीज येथील १, उरुळी देवाची येथील ४,
बारामतीतील पिंपळी व लिमटेक येथील ४, निरनिमगावात नसणा-या १०२ जणांची नावे मतदार यादीत नोंदविण्यात आली आहेत. याशिवाय ४० अल्पवयीन मुलांनी देखील मतदान केल्याचे व लाखेवाडी गावच्या मतदार यादीत परराज्यातील लोकांची नावे असल्याचे सत्यप्रतीतील पुरावे पाटील यांनी पत्रकारांसमोर सादर केले. तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यातील ७८ मतदार बोगस असल्याचे आदेश दिले होते, मात्र त्यांची बदली झाल्याने आदेशावर सही होऊ शकली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. नवीन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला आहे. फक्त एका गावातील ही स्थिती नसून आपण घेतलेल्या माहितीनुसार संपूर्ण इंदापूर तालुक्यात तब्बल १७ हजारांहून अधिक बोगस मतदार नोंदवले गेले असल्याचे त्यांचे म्हणणे असून याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात जावू असे सूतोवाच त्यांनी केले.
इंदापूर तालुक्यात सुमारे १७ हजार बोगस मतदार असल्याचा नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व निरनिमगाव गावचे सरपंच प्रताप सर्जेराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यात कोणते ही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण तहसीलदार जीवन बनसोडे यांनी केले आहे.
निरनिमगावचे विजय मारुती पाटील यांनी यापुर्वी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करुन त्या अर्जानुसार हितसंबंधितांना चौकशीकामी हजर राहून म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार सुनावणी घेण्यात आली असून सुनावणी दरम्यान अनेक मतदारांनी हजर राहून ते निरनिमगाव येथील रहिवाशी असून काही कालावधीसाठी नोकरी, मोलमजुरीचे कामकाजासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ गाव निरनिमगाव हेच असल्यामुळे निरनिमगाव येथील मतदार यादीतून हरकत अर्जदार यांचे हरकती वरुन मतदार यादीतून नावे कमी करु नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे kdil शुध्दीपत्रक मध्ये नमूद आदेशानुसार विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागांमध्ये विभागून ती निवडणूकीसाठी छापून घेणे व अधिकाऱ्यांनी अधिप्रमाणित करणे आवश्यक आहे. असे करताना संबंधित क्षेत्राची विधानसभेची मतदार यादी जशी आहे तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागायची आहे. त्यामध्ये कोणते ही नावे वाढविणे, कमी करणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे इत्यादींची अनुमती देण्यात आलेली नाही. मतदार यादीवर हरकत ही त्या आदेशासोबत जोडलेले विहीत नमुन्यातील परिच्छेद-अ, नाव वगळणेसाठी परिच्छेद-ब मध्ये तक्रार अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. आक्षेपक तक्रारदाराने परिशिष्ट ब या विहीत नमुन्यात सादर केलेल्या तक्रार अर्जासोबत आक्षेपित मतदारांच्या वास्तव्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदारासाठी स्वतंत्र हरकत अर्ज दाखल करावा लागेल. कोणत्या ही परिस्थितीत एकगठ्ठा पध्दतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरुपात हरकती दाखल करता येणार नाहीत. उपरोक्त वस्तुस्थिती नुसार हरकतदाराने दाखल केलेली हरकत ही प्रत्येक मतदार निहाय स्वतंत्ररित्या दाखल केलेली नाही, हरकत अर्जासोबत जोडलेले यादीतील मतदार अन्य कोणत्या गावचे मतदार यादीत त्यांची नावे आहेत याचा ही पुरावा सादर केला नाही. कोणत्या ही परिस्थितीत एकगठ्ठा पध्दतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरुपात हरकत दाखल करता येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने व सद्यस्थितीत झालेल्या विधानसभा मतदार यादीतून आपले हरकतीवरुन कोणते ही नाव कमी करता येणार नाही. याप्रमाणे उत्तर पाठवून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली ठेवण्यात आला आहे. त्यानुषंगाने संबंधित अर्जदारांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये अवर सचिव, उप मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचेकडे इंदापूर तहसील कार्यालयाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांचे कार्यालया मार्फत अहवाल ही सादर केला आहे.
उपरोक्त प्रकरणी विजय मारुती पाटील विरुध्द महाराष्ट्र राज्य व इतर या न्यायालयीन प्रकरणातील दुबार मतदार नोंदणींच्या संदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा २०२४ च्या मतदार यादीनुसार निरनिमगावची मतदार संख्या २ हजार ९७४ असून त्यापैकी बी.एल.ओ. सर्वेमध्ये आढळून आलेले दुबार मतदार शून्य आहे. नमुना क्रमांक ७ नुसार भरण्यात आलेल्या मतदारांची संख्या २ असल्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी शेवटी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा