इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ संदेश शहा
मो:-9921 419 159
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषद व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीने गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुला वर दिनांक २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पुणे जिल्ह्याने वरिष्ठ गटात लक्षवेधी कामगिरी करत सर्वसाधारण विजेते पदाचा मान पटकावला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालक मंत्री अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांनी जनरल चॅम्पियनशिप मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक उंचावल्याबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांतील २४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. निकालात पुणे जिल्हा प्रथम, नागपूर द्वितीय तर ठाणे तृतीय क्रमांकावर राहिले. पुण्याच्या विजयात विनायक रास्ते, राहुल सांडभोर, जीवन निकाळजे, दिगंबर काष्टे, योगेश वैद्य, योगेश्वर सानप, इंदापूरचे योगशिक्षक प्रशांत गिड्डे, सीमा पवार, राखी गुगळे व रमा झा यांनी उत्तम कामगिरी केली. संघनायक प्रतिमा दंडगे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
पारितोषिक वितरण समारंभास अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी प्रमुख पाहुणे होते. यावेळी सचिव राजेश पवार, अनिल मोहगावकर, डॉ. वशिष्ठ खोडस्कर, विनायक अंजनकर, संयोजक छाया मिरकर व सुरेश मिरकर उपस्थित होते.
या सहाव्या राज्यस्तरीय योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत इंदापूर पतंजली चे योगशिक्षक प्रशांत गिड्डे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत वरिष्ठ गटातील सुपाईन इव्हेंटमध्ये द्वितीय क्रमांकाचे सिल्व्हर मेडल पटकावून इंदापूरचा मानसन्मान उंचावला.
प्रशांत गिड्डे यांच्या या यशाबद्दल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने, संचालक प्रविण माने, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर वकारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर पतंजलीचे प्रभारी मल्हारी घाडगे आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा