Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

सदाशिवराव माने विद्यालयात पारंपरिक भोंडला उत्साहात साजरा

 


प्रतिनिधी - शकूर तांबोळी, अकलूज.

सण-उत्सवाच्या परंपरा जपत सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे भोंडला कार्यक्रम दिमाखात पार पडला. गावागावांत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा भोंडला हा स्त्रियांचा पारंपरिक सण असून, मुलींना व महिला शिक्षकांना यामधून संस्कृतीची गोड शिकवण मिळते. या वर्षी विद्यालयाने हा उपक्रम अधिक उत्साहात साजरा करून उपस्थितांचे मन वेधले.



या भोंडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका सौ. निशा गिरमे व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. गायत्री शेटे, सदस्या सौ. रुपाली दबडे यांच्या हस्ते भोंडला सणाचे प्रतिक हत्ती असलेल्या देवतेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने महिला शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. 



याप्रसंगी पारंपरिक गाणी म्हणत मुलींनी तसेच महिला शिक्षकांनी एकत्रित फेर धरून वातावरण भारून टाकले. ‘भोंडला गीतां’मुळे विद्यालयात सणासुदीचा माहोल निर्माण झाला. यावेळी खिरापतीचा प्रसाद दाखवून सर्वांना वाटप करण्यात आला. खिरापतीची माहिती व तिच्या परंपरेची ओळख मुख्याध्यापक श्री. अमोल फुले यांनी करून दिली.



या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचा क्षण उपस्थितांच्या मनात ठसा उमटवणारा ठरला. जय विजय प्राथमिक संघ शिक्षक सोसायटी, अकलूजच्या वतीने विद्यालयाला ‘रत्नाई आदर्श शाळा पुरस्कार’ प्राप्त झाल्याप्रित्यर्थ माता पालक संघाच्या वतीने मुख्याध्यापक मा. अमोल फुले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण कार्याचा व सांस्कृतिक जाणीवेचा हा योग्य गौरव असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिला धाईजे यांनी सुबोधपणे केले. आभार प्रदर्शन कु. प्रतिभा राजगुरु यांनी मानले. भोंडल्याच्या गीतांना कु. स्नेहा शिदे, सुहास पवार व बाळासाहेब झांबरे यांनी संगीताची साथ देऊन कार्यक्रम अधिक रंगतदार केला.



या पारंपरिक भोंडला उत्सवातून विद्यार्थिनींना भारतीय संस्कृतीतील स्त्रीसन्मान, एकोपा व सामूहिक आनंद यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. विद्यालयाने परंपरा व प्रगतिशीलता यांचा समन्वय साधत उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याने हा भोंडला सर्वार्थाने संस्मरणीय ठरला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा