इंदापूर तालुका ---प्रतिनिधी
डॉ.संदेश शहा
मो:-9921 419 159
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील भीमा नदी काठच्या गावांमधून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर इंदापूर पोलीसांनी धडक कारवाई करून १३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध वाळू वाहतूक प्रकरणी सूरज संजय तोबरे व समाधान गोरख शिंगाडे या दोघाविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई नंदू बाळू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता उजनी पाणलोट क्षेत्रातील भीमा नदी काठी इंदापूर तालुक्यातील मौजे शिंगाडेवस्ती माळवाडी नंबर २ येथील जिल्हा परिषद शाळे समोरील रस्त्यावर सूरज संजय तोबरे ( रा. सरडेवाडी ) व समाधान गोरख शिंगाडे ( रा. माळवाडी नं.२ शिंगाडेवस्ती ) हे सूरज तोबरे याच्या मालकीच्या आयशर कंपनीचे हायवा वाहनात ( क्र. एमएच ४२ बीएफ ८२३९ ) व सुहास शिंगाडे यांच्या मालकीच्या टाटा मोटर्सच्या एन्ट्रा वाहनातून (क्र. एमएच ४२ बीएफ ५५६१) कोणताही परवाना न घेता वाळूची चोरी करून तिची वाहतूक करत असताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी दोन्ही वाहनात मिळून सुमारे १८ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू, तसेच दोन्ही वाहने, असा एकूण १३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इंदापूर तालुक्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्रात भिगवण ते कांदलगाव या ४० किलोमीटर तसेच नीरा भीमा नदी संगम परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा तसेच वाहतूक होऊन शासनाचा मोठा महसूल बुडतो. तो रोखण्यासाठी यापूर्वीचे तहसीलदार श्रीकांत पाटील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रतिबंधक पॅटर्न राबवावा अशी मागणी नागरिक करत आहेत तर शासनाचा महसूल वाढविण्यासाठी ग्रामपंचायतींना विशेष अधिकार शासकीय वाळू धोरणातून द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा