सहसंपादक -डॉ. संदेश शहा इंदापूर
मो. ९९२२४१९१५९
इंदापूर तालुक्यातील काटी येथील श्री काटेश्वर विद्यालयात १५ वर्षांपूर्वी इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत पळसदेव येथील देवराई फार्ममध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी व शिक्षक पुन्हा एकत्र आले, त्या अनमोल सुवर्णक्षणांचा अनुभव त्यांनी पुन्हा एकदा घेतला. यानिमित्त शिक्षकांचा कृतज्ञता सन्मान संपन्न झाला. यावेळी हसू आणि अश्रू याचे अनोखे क्षण सर्वांनी अनुभवले.
गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रियांका ओगले यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षकांचा विशेष सत्कार करून त्यांनी स्नेहमेळाव्याची पार्श्वभूमी विशद केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचा खडतर यशस्वी प्रवास, व्यवसाय व कुटुंबातील यशाविषयी सांगताना विद्यालयात मिळालेल्या संस्कारांविषयी तसेच गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी माजी विद्यार्थी आकाश भोसले म्हणाले, विद्यालयाने आमच्यातील आत्मविश्वास निर्माण करून शिक्षणासोबत आयुष्याचे धडे दिले. पुन्हा सर्व मित्रांना भेटल्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून हा स्नेह असाच कायम राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दीपाली शिंगाडे म्हणाल्या,१५ वर्षांनंतर सगळ्यांना भेटणं म्हणजे आयुष्यात पुन्हा शालेय दिवस अनुभवण्यासारखं आहे.
शिक्षक घनश्याम लोंढे म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील घेतलेले शिक्षण व संस्कार याच्या जोरावर विविध क्षेत्रात नाव कमावले आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. १५ वर्षांनंतर देखील त्यांनी शाळेच्या आठवणी जिवंत ठेवल्या, ही खूप भावनिक करणारी बाब आहे.
शिक्षक अशोक सरताळे म्हणाले, उपस्थित सर्व चेहऱ्यांकडे पाहून पुन्हा तो काळ डोळ्यांसमोर आला. आत्मीयतेने आमचा केलेला सत्कार हृदयस्पर्शी होता.
यावेळी संगीत खुर्ची, छायाचित्रण सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सर्वांनी सामुहिक जेवणाचा आनंद लुटला. पुढील वर्षांत ही अशीच भेट घेण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका ओगले, सागर करे यांनी तर गणेश भोसले यांनी आभार मानले.
या स्नेहमेळाव्यासाठी घनश्याम लोंढे,अशोक घोळवे, पांडुरंग सपकळ, गजानन निलाखे, अशोक सरताळे, दत्तात्रय पांडव, अनिल सोनटक्के,शिवाजी करे या शिक्षकांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम गोरे, कांचन कुबेर,अविनाश इमाने, विशाल भोसले, गौरी कुदळे, किरण देवकर, सागर हवालदार यांसह इतरांनी स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ : स्नेहमेळाव्यात सहभागी माजी विद्यार्थी व शिक्षक.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा