*सहसंपादक- डॉ-संदेश शहा इंदापूर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9922419159*
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे घनिष्ठ निकटवर्ती, इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील सुपुत्र तसेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रौप्यमहोत्सवी साथ सोडून बुधवार दि.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबई येथे माजी आमदार राजन पाटील व शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह भाजप पक्षात जाहिर प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. माने यांनी भाजपा मध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केला. माजी आमदार यशवंत माने यांनी तब्बल २५ वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कुरघोड्या मुळे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
माजी आमदार यशवंत माने म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन व नेतृत्वा खाली मोहोळ मतदार संघ तसेच सोलापूर व पुणे जिल्ह्यातील भाजपा मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेवून पक्ष संघटन मजबुतीकरण करण्यासाठी नियोजनबध्द पद्धतीने काम केले जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही माजी आमदार यशवंत माने यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील भाजपा मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती तथा सोनाई दूध संघाचे संचालक प्रवीण माने, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार यशवंत माने यांनी देखील भाजपा मध्ये प्रवेश केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपास फायदा झाला आहे.
मोहोळचे माजी आमदार यशवंत माने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव गावचे सुपुत्र असून ते सन १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बरोबर पक्षात काम करत विविध पदावरती पक्ष संघटनेमध्ये व विविध राजकीय संस्थेवरती काम करत आहेत. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांचा इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी मोठा चाहता वर्ग असून त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे. मोहोळ बरोबरच इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेवून काम केले जाईल अशी ग्वाही भाजप मध्ये दाखल झालेले मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी देऊन आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.
फोटो ओळ - मुंबई येथे भाजप मध्ये प्रवेश प्रसंगी मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांचे स्वागत करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व मान्यवर.
*जाहिरात*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा