सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
इंदापूर एस.टी.बस स्थानकाच्या आवारात थांबलेल्या धाराशिव- पुणे एस. टी. बसच्या इंजिनात अचानक बिघाड होवून ती जागीच आगीत भस्मसात झाली. शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बसचा बर्निंग थरार घडला. मात्र
एस. टी. बसचे चालक, वाहक यांनी प्रसंगावधान राखून एस.टी.तील सर्व म्हणजे ५० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. या आगीत प्रवाशांच्या ७ लाख ३९ हजार २०० रुपयांच्या चीजवस्तू व एस. टी. बसचे १२ लाख रुपये अशी एकूण १९ लाख ३९ हजार २०० रुपयांची वित्तहानी झाली आहे. एस.टी.चे वाहक कृष्णा गुलझार कांबळे ( रा.घाटंग्री ता. व जि.धाराशिव ) यांनी इंदापूर पोलिसांकडे या घटनेची खबर दिली.
फिर्यादी श्री. कांबळे व त्यांचे सहकारी एस.टी चालक नेताजी रामलिंग शितोळे हे त्यांच्या ताब्यातील धाराशिव एस. टी. आगाराची धाराशिव हून पुण्याला जाणारी एस. टी. बस ( क्र.एमएच २० बीएल ४२३३) घेवून दीड वाजण्याच्या सुमारास इंदापूर एस.टी.बस स्थानकाच्या आवारात आले. तेथील फलाट क्रमांक १२ वर ती बस थांबवून ते दोघे नोंदणी करण्यासाठी बस स्थानकातील संबंधित कार्यालयाकडे जात असताना एस.टी.च्या इंजिनखाली ठिणग्या पडून जाळ लागल्याचे दिसल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून ते दोघेही एस.टी. बस जवळ आले. आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतू मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळल्याने ती आटोक्यात आणता आली नाही. त्याही गंभीर स्थितीत प्रसंगावधान राखून त्यांनी एस. टी. बसमध्ये असणाऱ्या सर्व पन्नास प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली.
या आगीत खबर देणारे श्री. कांबळे यांचे वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, नियमीत वापरातील शासकीय गणवेश, निखील दत्तात्रय मेटे या प्रवाशाचा वन प्लसचा टॅब, चार्जर, कपडे, पाकीट, आधार कार्ड, लायन्सस, पॅनकार्ड, युनीयन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम असे ३५ हजार रुपयांच्या वस्तू जळाल्या. पार्थ सचिन काळे याचे कपडे, बॅग, पावर बँक, चप्पल, चार्जर वॉलेट व त्यातील एक हजार रुपये, ओंकार बंडू मदने याचे कपडे, पॉकेट, लायसन्स, पॅन कार्ड, व ५ हजार ७०० रुपयांची रोकड, धनंजय विठ्ठल कांबळे यांच्याकडील गळ्यातील ४ तोळ्याचा सोन्याचा गंठण, १ तोळ्याची सोन्याची अंगठी, कानातील दीड तोळ्याचे सोन्याचे दोन जोड,चांदीचे पैंजण,१२ साड्या, गाडीचे आर. सी. बुक, लायसन्स, पॅनकार्ड, आधारकार्ड असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांच्या चीजवस्तू,अक्षय पांडुरंग तनपुरे यांच्याकडील ४.८ तोळ्याचा सोन्याचा गंठण, पाच साड्या असा २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज, ऋषिकेश हरी खंडागळे यांचे लिनोआ व थिंक पॅड व एच. पी कंपनीचे लॅपटॉप, त्याचे चार्जर, सर्व कपडे, वालेट, पैसे, मोबाईलचा चार्जर, एचडीएफसी व एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड, कंपनीचे आयकार्ड व आधारकार्ड असा १ लाख रुपयांच्या चीजवस्तू, नेहा गोविंदराव पाटील यांचे कपडे, मोबाईल चार्जर, वॉलेट व त्यातील कागदपत्रे बँक ऑफ बडोदा व युनियन बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड व रोख रक्कम १२ हजार ८०० रुपये असे एकूण १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.जगन्नाथ साहेबराव जाधव यांची बॅग व त्यातील साहित्य, प्रिंन्टर, चार्जर, डबा आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड व पत्नीची सर्व कागदपत्रे व ३ हजार ५०० रुपयांची रोकड अशा ४५०० रुपयांच्या वस्तू व कागदपत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे.
. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून दररोज ५०० हून अधिक एसटी बसेस या बस स्थानकातून ये जा करतात मात्र बस स्थानकात प्रथमच बस पेटून भस्मसात होण्याचा प्रकार घडला त्यामुळे बस स्थानकात अग्निशामक बंब असणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया प्रवाशामधून व्यक्त होत आहे. एस टी महामंडळाने प्रवाशांचे झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी या बसमधील प्रवाशांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा