*अकलूज -- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ सुरू असून याबाबत वाहन व वाहन चालक यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांचे प्रतिनिधी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शितल शिंदे यांनी कारखाना कार्य स्थळावरती उपस्थित सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालक यांना वाहतूक करत असताना घ्यावयाची दक्षता व काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांनी ऊस वाहतूक करत असताना होणारे अपघात व याबाबत वाहन चालकांनी घ्यावयाची दक्षता यामध्ये वाहनाचा वेग रिफ्लेक्टरचा वापर,योग्य दिशेने वाहन चालवणे, वाहनाच्या टेप रेकॉर्डरचा आवाज नियंत्रित ठेवणे,एका ट्रॅक्टरच्या पाठीमागे दोनपेक्षा जादा ट्रॉली न जोडणे,वाहन चालविताना मद्यपान, मोबाईलचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहतूक न करणे,विना पासिंग वाहन ऊस वाहतुकीकरता न वापरणे इत्यादी अनुषंगिक बाबत सूचना व मार्गदर्शन केले तसेच आपल्या व इतरांच्या कुटुंबाप्रती असणारी जबाबदारीची जाणीव व भावना निर्माण केली.या सूचना व मार्गदर्शनामुळे कोणताही अपघात होऊन जीवित हानी होऊ नये तसेच गुन्हे दाखल होऊ नयेत अथवा इतर व आपल्या वाहनाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेतल्याने होणारा मोठा अनर्थ टळणार आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे शेती अधिकारी समाधान चव्हाण यांनी उपस्थित पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगती पथावर वाटचाल सुरू आहे.त्यांच्या शिस्तबद्ध परंपरेनुसार कारखान्याचे अपघात मुक्त व नाव लौकिकास पात्र असे कामकाज सुरू आहे असे सांगितले.सहकार महर्षी कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये अथवा अपघात घडू नये याकरिता कारखान्याच्या संचालिका कु.स्वरुपाराणी जयसिंह मोहिते- पाटील यांच्या कल्पनेतून वाहनचालक यांच्यामध्ये सुरक्षेतेची जागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आज कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मुकादम,वाहन चालक-मालक,शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे शिबिर संपन्न झाल्याने वाहन चालकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा