सहसंपादक संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
इंदापूरचा मी आमदार असल्याने सरकारचा निधी माझ्या माध्यमातून येत आहे, येणार आहे. मी आणखी चार वर्ष व एक महिना आमदार आहे. निधी कसा आणायचा हे मला चांगले माहित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठ शहा व संपूर्ण पॅनेलला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर शहर दर्गा मशीद चौक, श्रीराम कॉलनी येथे मंत्री दत्तात्रय भरणे यांचा झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला. यावेळी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जे भरतशेठ व माझ्यावर टीका करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याचे काही कारण नाही. ज्या झाडाला फळ आहे, त्याच झाडाला लोक दगडे मारतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांना विकास करून उत्तर देणार असे म्हणत मंत्री भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर तसेच प्रवीण माने यांचा साधा नामोल्लेख देखील केला नाही. यावेळी मंत्री भरणे यांनी शहरासाठी निधी कोणी दिला हे उपस्थितांकडून वदवून घेतले तर आप्पासाहेब जगदाळे यांनी सर्वांना हात वर करण्याचे आवाहन करताच सर्वांनी पॅनेलचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली.
मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मी आतापर्यंत चारवेळा आमदारकीची निवडणूक लढवली. मला एक वेळा पराभव स्वीकारावा लागला तर तीन वेळा मी विजयी झालो. तुमच्या आशीर्वादामुळे मी मंत्री देखील झालो. त्यामुळे कर्तव्य म्हणून इंदापूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून आणखी देणार आहे. करमाळा व इंदापूर तालुक्याला जोडणारा ३८२ कोटी रुपयांचा भीमा नदीवरील पूल आगामी काळात इंदापूरचा पाचपट व्यापार वाढविणार आहेत तर भुयारी गटारासाठी ६१ कोटी, शहर रस्त्यांसाठी ९१ कोटी, क्रीडा संकुल साठी ५६ कोटी, नवीन नगरपरिषद इमारती साठी १० कोटी, युवापिढीस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ५ कोटी रुपयांची अभ्यासिका यासाठी निधी दिला असून विकसित इंदापूर शहर म्हणून शहराची नवीन ओळख निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांची गढी संवर्धन तसेच चांदशहवली बाबा दर्गा यासाठी देखील निधी दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगररचना विभाग तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आमदार म्हणून मी जास्तीचा निधी आणू शकतो. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व पारदर्शी कारभार करणारे भरत शहा यांच्यासह पॅनेलला भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, इंदापूरकरांचे प्रेम भरतशेठ वर आहे. त्यामुळे आमच्या पॅनेल ला मत म्हणजे इंदापूर शहराच्या प्रगतीसाठी मत होय. तुम्हाला कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास, आम्ही सर्व जण निश्चित धावून येवू. ज्यांच्याकडे इंदापूर नगरपरिषदेची दहा व पंधरा वर्ष सत्ता होती, त्यांनी शहराचा का विकास का केला नाही असा सवाल करून तिन्ही विरोधक केवळ स्वार्थासाठी एकत्र आल्याचा आरोप त्यांनी विरोधी पॅनेल नेत्यांचे नाव न घेता केला.
यावेळी भरतशेठ शहा म्हणाले, राजकारणात लोक पदे मिळवण्या साठी प्रयत्न करतात मात्र मी चार पदांचा राजीनामा देऊन बाहेर पडलो आहे. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियानात चांगले काम सलग पाच वर्ष करून शहरास राष्ट्रीय पातळीवर झळकवले तसेच २२ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. इंदापूर नगरपरिषद डिजिटल झाली आहे. त्यामुळे शासनास सर्व बाबी माहिती पडतात. तुम्ही पाच वर्ष झाले शास्ती साठी आंदोलन करत आहात मात्र एकही शासकीय अधिकारी शास्ती चुकीची लावली असे म्हणत नाही कारण विनापरवाना बांधकाम, मान्यतेपेक्षा जास्त बांधकाम, बांधकाम करताना रस्ता सोडला नाही या व इतर कारणांनी शासन नियमाप्रमाणे शास्ती लागली आहे. ती देखील कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या लोकांना घरकुल मंजूर आहे, पण जागा नावावर नाहीत त्यांच्यासाठी देखील प्रयत्न करत आहोत. शास्तीवर खोटे बोल पण रेटून बोलणाऱ्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. आतापर्यंत केलेल्या विकासामुळे आमचा पॅनेलचा २१ विरुद्ध शून्य असा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी आत्मविश्वास पूर्वक केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, आरपीआय आठवले गटाचे बाळासाहेब सरवदे, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, शकीलभाई सय्यद, पोपटराव पवार, उज्ज्वला चौगुले, सुधीर मखरे, रमेश शिंदे आदींची भाषणे झाली.
यावेळी प्रतापराव पाटील, सचिन सपकळ तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगराध्यक्ष सुरेश गवळी, बाळासाहेब पाटील, गणेश पाटील, पोपट शिंदे, स्वप्नील राऊत, प्रमोद राऊत, बंडा चव्हाण, सुनील तळेकर, अमोल माने, मनोज राजगुरू यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत सिताप यांनी केले







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा