सहसंपादक --डॉ.संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कृष्णा-भिमा आघाडी च्या माध्यमातून एकत्र आलो आहे. प्रदीप गारटकर यांच्या विरोधात मी तीन वेळा तर प्रवीण माने यांच्या विरोधात एक वेळ विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांच्याशी आमचा राजकीय, वैचारीक संघर्ष होता. त्यांचे आमचे कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. कृष्णा भीमा आघाडी च्या माध्यमातून आम्ही शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. ही आघाडी आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका समान कार्यक्रम घेऊन लढणार आहे. आमच्या आघाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना राज्यातील नगरपरिषद निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
बुधवार दि. १९ नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील सरस्वतीनगर परिसरात कृष्णा-भिमा विकास आघाडीच्या वतीने प्रचार शुभारंभ सभा संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष किरण गोफणे यांनी कृष्णा भीमा आघाडीस जाहीर पाठिंबा घोषित केला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, ऐतिहासिक इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहरात मोठी बाजारपेठ उभारणे, तरुण बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देणे, शहरात सामाजिक, धार्मिक सलोखा राखणे हा आमचा अजेंडा आहे. तालुक्यात तीन मोठ्या संस्थांची पदे देऊन सुद्धा ते आमच्या विरोधात गेले अशी टीका त्यांनी शहा परिवाराचे नाव न घेता केली. प्रदीप गारटकर हे धडाडीचे नेते असून गारटकर यांचा विजय निश्चित आहे. शहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे २००९ साली सुरुवातीला विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले, तेव्हा तालुक्यातील पक्षातील मोठ-मोठे नेते पक्षाला सोडून निघून गेले. तेव्हा मी पक्ष न सोडता मंत्री भरणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. चार विधानसभा निवडणुकीत मी त्यांच्या पाठिशी होतो. तीन वेळा त्यांना निवडून आणले, आमदार केले पुढे ते मंत्री झाले. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली. त्यांनी तालुक्यातील गावा गावातील माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला, त्यांची मुस्कटदाबी केली. आता भरणे यांनी मलाच संपविण्याचा घाट घातला आहे. मला सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ७५ हजार मते मिळाली होती मात्र मी माझा गट न ठेवता पक्षाचे काम केले.
मी लढणारा कार्यकर्ता आहे. यापुढील काळात पुन्हा नव्या उमेदीने, जिद्दीने कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणार आहे. पक्षाचे संघटन कौशल्य मजबूत करून, कर्तबगारी सिद्ध करून देखील माझे होमपीच असलेल्या इंदापूर च्या निवडणुकीत जिल्हाध्यक्ष म्हणून माझे मत डावलले. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या केसास धक्का म्हणजेच माझ्या काळजाला धक्का असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी तसेच हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक लढवत असून त्यामुळे राज्यात योग्य संदेश गेला आहे. आपण ही निवडणूक निश्चित जिंकू असे सूतोवाच प्रदीप गारटकर यांनी केले.
भाजप नेते प्रवीण माने म्हणाले, इंदापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र शहराचा योग्य विकास झाला नाही. शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी नगराध्यक्ष पदी प्रदीप गारटकर तसेच कृष्णा-भिमा आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासाची गंगा आणू असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन गफुरभाई सय्यद यांनी केले.
यावेळी नानासाहेब शेंडे, तानाजीराव थोरात, विठ्ठलराव ननवरे, धनंजय बाब्रस, डॉ. रियाज पठाण, उमेश क्षीरसागर, सारिका पवार, जमीर देशमुख, संदीप चव्हाण, अक्षय जगताप, श्री. मुलाणी, श्री. शेख यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा