Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक असलेल्या "वंदे मातरम" गीताला १५० वर्षे पूर्ण- राष्ट्रभावने चा शाश्वत जयघोष..

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


वंदे मातरम गीताला आज १५० वर्षे पूर्ण राष्ट्रभावनेचा शाश्वत जयघोष….

            भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात “वंदे मातरम” हे गीत केवळ शब्दांचे नव्हे तर एका राष्ट्राच्याv आत्म्याचे प्रतीक आहे. आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजी या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असताना, त्याचा इतिहास, सांस्कृतिक प्रभाव आणि राष्ट्रभावनेतील स्थान पुन्हा उजळून दिसत आहे. हे गीत म्हणजे भारतीय जनमानसाच्या ओंजळीत ठेवलेले आदराचे, श्रद्धेचे, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रअभिमानाचे प्रतीक आहे.

         “वंदे मातरम” या गीताची निर्मिती १८७५ मध्ये बंगालच्या राष्ट्रपुरुष बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली. त्यांनी आपल्या “आनंदमठ” या कादंबरीत हे गीत अंतर्भूत केले. त्या काळात ब्रिटिश सत्तेचा अंमल सर्वत्र देशभर पसरला होता, आणि भारतीय जनतेत नैराश्य पसरले होते. अशा स्थितीत बंकिमचंद्रांच्या लेखणीतून उगवलेले “वंदे मातरम” हे गीत भारतीयांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले. यात “मातृभूमी”चे दर्शन फक्त भूमीच्या रूपात नाही, तर देवीच्या साक्षात रूपात करण्यात आले. या गीताने भारतीयांच्या अंतःकरणात देशभक्तीची ज्योत पेटवली.

         “वंदे मातरम”चा पहिला सार्वजनिक जयघोष १८९६ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात झाला. त्यानंतर हे गीत स्वातंत्र्यलढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणेचे मूळ प्रतिक बनले. ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा लोक उठून उभे राहिले, तेव्हा त्यांच्या तोंडी होते  “वंदे मातरम”! हे दोन शब्द म्हणजे स्वातंत्र्यलढ्याचे ते रणघोष होते.याच गीतामुळे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिश अत्याचारांना सामोरे जावे लागले. पण त्यांनी या जयघोषाचा त्याग केला नाही. हे गीत इतके प्रभावी होते की इंग्रजांनी काही ठिकाणी त्यावर बंदी आणली. पण “वंदे मातरम”चा जयघोष गप्प राहिला नाही. तो भारतीयांच्या मनामनात राष्टभक्ती अन् राष्ट्रप्रेमाने घुमत राहिला.

        भारत स्वतंत्र झाल्यानंतरही या गीताला संविधानिक महत्त्व देण्यात आले. २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने “वंदे मातरम” या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला, तर “जन गण मन” राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. “वंदे मातरम” हे आजही आपल्या राष्ट्रभक्तीचे अमूल्य प्रतीक आहे. त्यातील प्रत्येक ओळ मातृभूमीविषयीचा अभिमान, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करते.

“सुजलां सुफलां मलयजशीतलां,

 शस्यश्यामलां मातरम्।”

           या गीतातील प्रतिमा, निसर्गाचे वर्णन आणि मातृभूमीचे रूपक हे भारतीय संस्कृतीतील एकात्मतेचे दर्शन घडवतात. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन सर्व धर्मांचे लोक या गीतात स्वतःला ओळखतात, कारण हे गीत धर्मापलीकडील राष्ट्रभावनेचे प्रतीक आहे.

       आज “वंदे मातरम” गीताला १५० वर्षे पूर्ण होत असताना, त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारतातही हे गीत आपल्याला स्मरण करून देते की, स्वातंत्र्य हे सहज मिळालेले नाही; त्यासाठी असंख्य बलिदाने, त्याग आणि संघर्ष झाले आहेत. “वंदे मातरम” हे केवळ एक गीत नाही, तर भारतीय आत्म्याचा नाद आहे, जो कालातीत आणि अमर आहे.

       आजच्या युवा पिढीने या गीताचा अर्थ समजून घेऊन मातृभूमीबद्दलची जबाबदारी ओळखली पाहिजे. “वंदे मातरम” हे आपल्या संस्कृतीचे, स्वाभिमानाचे आणि देशभक्तीचे प्रतीक आहे.जे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव गुंजत राहावे, हीच या गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीची खरी आदरांजली ठरेल.

       वंदे मातरम — भारत माता की जय! 🇮🇳

                       डॉ. प्रकाश पांढरमिसे

                             मो. नं. 9423639796


______________________________________________


__


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा