Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

"उद्धव ठाकरेंचे" शिवसैनिक लागले कामाला घरोघरी जाऊन करतायेत मतदारांची पडताळणी

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी (ठाकरे) मतदार यादीतील घोळ शोधून काढण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी आपापली पथके तयार करून मतदारयादीतील नवीन नावे, वगळलेली नावे, दुबार नावे यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या १४ नोव्हेंबरला निवडणूक आयोग मतदार यादी जाहीर करणार असून त्याच्याआधी माहिती गोळा करण्याचे उद्दिष्ट्य शिवसैनिकांनी ठेवले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी येथे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ठाकरे यांनी मतचोरीवर सरकारवर टीका केली होती. मतदार यादीत घोटाळा असल्याचे सांगताना हा घोळ शोधण्यासाठी याच मेळाव्यात ठाकरे यांनी विभागप्रमुखांपासून ते गटप्रमुखांपर्यंत सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील सर्व विभागातील शिवसैनिक, पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. मतदार याद्यांमधील घोळ शोधण्यासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची पडताळणी करण्याचे काम केले जात आहे.

शिवडी मतदारसंघतातही या कामाला जोर आला आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी शोधल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर किती नावे वगळली, किती नावे नव्याने नोंद झाली, किती नावे दुबार आहेत, ज्येष्ठ नागरिक किती आहेत, बोगस नावे आहेत का याची पडताळणी केली जात आहे. त्याकरीता दरदिवशी दोन बूथ करण्याचे उद्दीष्ट्य ठेवले असल्याचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.

शिवडी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या विभागात घराघरात शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, चाळ प्रतिनिधी आहेत. त्यांचीही मदत या कामासाठी घेतली जाणार आहे. या कामासाठी संगणकीय सॉफ्टवेअरचीही मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या ठिकठिकाणी शाखा असून या शाखांच्या माध्यमातून मतदार यादीची पडताळणी केली जात आहे. शाखांमध्ये बैठका घेतल्या जात असून मतदार यादी कशी तपासायची याचीही माहिती उपशाखाप्रमुख, गटप्रमुखांना दिली जात आहे. प्रत्येक उपशाखाप्रमुखाकडे दोन गटप्रमुख असतात. एका गटप्रमुखाकडे सुमारे हजार बाराशे मतदारांचा बूथ असतो. त्यामुळे प्रत्येक उपशाखाप्रमुख गटप्रमुखांकडील मतदार याद्या घरोघरी जाऊन पडताळून पाहत असल्याची माहिती सायन कोळीवाडा मतदारसंघातील उपशाखाप्रमुख गणेश शिंदे यांनी दिली

घरोघरी जाऊन घेतलेल्या या पडताळणीनंतर गोळा होणारी माहिती, दुबार मतदारांची यादी ही पक्षाला सादर केली जाणार आहे. तसेच मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जाणार आहे.

१४ नोव्हेंबरला मतदार यादी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १४ नोव्हेंबर रोजी मतदार यादी जाहीर होणार आहे. प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर २२ नोव्हेंबरपर्यंत त्यावर सूचना व हरकती मागवल्या जाणार आहेत. मतचोरीच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे यंदा मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा