पुण्यातील नामवंत वकील ॲड. असीम सरोदे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते राम खाडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर ॲड. सरोदे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्लाश
बुधवारी रात्री बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते राम खाडे यांच्यावर १० ते १५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. राम खाडे यांच्या पत्नी तुळसा खाडे यांनी या घटनेनंतर थेट आमदार सुरेश धस यांच्यावर हल्ले घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला होता. तुळसा खाडे यांनी सांगितले की, सायंकाळी ७ वाजता त्यांचे पती राम खाडे यांच्याशी बोलणे झाले होते आणि ते रात्री ९ वाजेपर्यंत घरी येणार होते, पण त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजले.
१००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ॲड. असीम सरोदे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश धस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आणि आपल्या जीवालाही धोका असल्याचे सांगितले.
सरोदे यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षांपासून राम खाडे यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. खाडे यांनी देवस्थानच्या जमिनीच्या संदर्भातील मोठा भ्रष्टाचार कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या लक्षात आणून दिला.श
सरोदेंचा नेमका आरोप काय?
"आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून तब्बल १००० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. देवस्थानच्या जमिनी त्यांनी स्वतःच्या खासगी लोकांच्या नावाने करून घेतल्या आहेत. यामध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांना मदत केल्याचे दिसून येते."श
कायदेशीर लढा!
या संदर्भात ॲड. सरोदे आणि राम खाडे यांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. मात्र, आमदार धस भाजपचे असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, तसेच पोलिसांनीही दखल घेतली नाही, असे सरोदे यांनी नमूद केले. अखेरीस, राम खाडे यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही.
'माझ्याही जीवाला धोका' - ॲड. सरोदे
राम खाडे यांच्यावर झालेल्या निर्घृण हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर ॲड. सरोदे यांनी चिंता व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी राम खाडे यांच्या शेतातील शेडवर आणि त्यांच्या नातेवाईकांवरही हल्ला करण्यात आला होता. राम खाडे यांनी विविध विभागात अर्ज करून स्वतःसाठी संरक्षण मिळवले होते, पण विशेष म्हणजे ते संरक्षण काढून घेण्यात आले होते. ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "राम खाडे यांच्यासारख्या व्यक्तीचं संरक्षण झालं पाहिजे. माझ्या देखील जीवाला धोका आहे. राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या आणि ॲड. सरोदे यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यानंतर बीडच्या राजकारणात आणि कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा