सहसंपादक--- डॉ, संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922 419 159
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते म्हणून कार्यरत असलेले सुरेश अनंतराव जकाते ( वय ५६ ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने इंदापूर तालुक्यात पत्रकारितेसह सर्व समाजघटकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेश जकाते यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी वडील कै. अनंतराव शामराव जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. विविध वर्तमानपत्रातून तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता केली तसेच अनेक वर्ष त्यांनी वृत्तपत्र विक्री या दोन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी विविध प्रमुख वृत्तपत्रां साठी बातमीदार, वार्ताहर म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या साधेपणामुळे, कामातील निष्ठेमुळे आणि बातमी संकलनातील अचूकतेमुळे ते नेहमीच सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. प्रवाहाविरुद्ध लिहिणारे पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. इंदापूर मध्ये पत्रकार भवन व्हावे ही त्यांची इच्छा होती. ते कट्टर हिंदुत्ववादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असले तरी त्यांनी नेहमी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. प्रथम इंदापूर तालुका सचिव, नंतर शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष असे करत ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम करत होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई व नात, भाऊ, भावजय, पुतणे व पुतणी असा परिवार आहे.
सुरेश जकाते यांच्या पार्थिवावर दिनांक सहा डिसेंबर रोजी इंदापूर शंभर फुटी रस्त्यावरील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे, जेष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर यांच्यासह विविध पत्रकार, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. इंदापूर तालुक्यातील पत्रकारितेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा