*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पाटील गटाची नीती, नेता व निशाण ठरलेले असुन योग्यवेळी यातील काही बाबी उघड होतील असे स्पष्टीकरण पाटील गटाकडून प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक ही आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाणार आहे तर या निवडणुकीसाठीची रणनीती कोअर कमीटीकडून आखली जात आहे. निवडणुकीसाठी वापरले जाणारे निशाण सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत असताना जगजाहीर होणार आहे. कदाचित निवडणुक निशाण हे नवीनही असु शकते. यामुळे पाटील गटाच्या इतर गटाशी होणाऱ्या संभाव्य युतीबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृत करण्यात आलेली नाही. सहकारी गटांना बरोबर घेऊन पाटील गट या निवडणुकीत उतरणार आहे. सोशल मीडिया वर इतर गटासोबतच्या युती अथवा पक्ष प्रवेश ह्या बातम्यात काही तथ्य नाही. आमदार नारायण आबा पाटील हे लोकप्रिय व करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन केलेले नेते असून आमदार म्हणून त्यांनी नेहमीच स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा बाजुला सारुन मतदार संघातील प्रश्न व विकासकामांना अगोदर प्राधान्य दिले आहे. करमाळा पंचायत समिती वर सध्याच्या प्रशासकीय काळापुर्वी पाटील गटाचीच सत्ता होती व जनतेने पंचायत समितीच्या माध्यमातून झालेल्या कामांची पोचपावती विधानसभा निवडणुकीत दिली आहे.यामुळे पंचायत समिती वर आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटाची सत्ता परत एकदा स्थापन होईल अशी मनोधारणा मतदार बाळगून आहेत. आमदार नारायण आबा पाटील यांच्या जनाधारात प्रत्येक
---जाहीरात---
निवडणुकीनंतर वाढच होत गेली आहे. विधानसभा निवडणुक सन १९९९ साली १२ हजार ५०० मते, सन २००९ साली ४२ हजार ५०० मते, सन २०१४ साली ६२ हजार ५०० मते, सन २०१९ मध्ये ७३ हजार मते तर सन २०२४ मध्ये तब्बल ९६ हजार मते मिळाली असून यावरुन जनतेचा विश्वास हा आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वावर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात पंचायत समितीच्या निवडणुकीत २५ वर्षानंतर झालेले सत्तांतर व पाटील गटाची सत्ता आणि आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेले एकहाती यश ह्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीतही सहकारी गटांना बरोबर घेऊन करमाळा तालूक्यावर होऊ पाहत असलेले व विकासाला बाधा आणणारे संक्रमण मोडुन काढले जाणार असल्याचा दावाही सुनिल तळेकर यांनी केला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा