*मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदानात वाढ करत दरमहा २५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील तब्बल १२,७६२ लाभार्थींना याचा फायदा होणार आहे. तथापि, या योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थींना आधार कार्ड योजना संलग्न करणे अनिवार्य केले आहे. तसेच लाभार्थ्यांचा यूडीआयडी (युनिक डिसेबिलिटी आयडी) अद्ययावत करून सादर करणेही बंधनकारक आहे. जिल्ह्यातील एकूण लाभार्थींपैकी सुमारे साडेचार हजार लाभार्थींनी अद्याप यूडीआयडी जमा केलेला नाही.
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांना यूडीआयडी व आधार कार्ड संलग्नीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग लाभार्थींनी योजनेला आपला यूडीआयडी कार्ड क्रमांक व आधार क्रमांक संलग्न असल्याची खातरजमा करावी, जेणेकरून त्यांचा लाभ नियमित सुरू राहील. विशेष साहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले अपडेट केलेले आधार कार्ड व यूडीआयडीची छायांकित प्रत आणि बँक पासबुकची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जमा करावी लागणार आहे.
'यूडीआयडी' कार्ड काढायचे कसे?
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना यूडीआयडी कार्डचे बंधन घातले आहे. याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र आता ऑनलाइन डिजिटल असावे, अशी अट आहे. सर्वोपचार रुग्णालयातील दिव्यांग विभागातून लाभार्थींना प्रमाणपत्र मिळते. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी ४० टक्क्यांवर दिव्यांग असणे आवश्यक आहे. शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर दिव्यांग लाभार्थी यूडीआयडी कार्डसाठी अर्ज करू शकतात. नव्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थींना दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, रहिवासी व वयाचा दाखला, आधारकार्ड द्यावे लागते. त्या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
निराधार योजनेच्या लाभार्थींसाठी..
दिव्यांग कल्याण विभागाच्या २७ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थींच्या विविध योजना व सवलतीचा लाभ घेण्यासाठी 'यूडीआयडी' कार्ड अनिवार्य केले आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींनी ३१ डिसेंबरपर्यंत ते कार्ड त्यांच्या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जाऊन जमा करावे.- शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा