सहसंपादक --डॉ .संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9922419159
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचा जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते वापरून घ्यायचे, मात्र त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल चकार शब्द देखील न काढता सर्वांना वाऱ्यावर सोडले. या प्रवृत्तीस विरोध करण्यासाठी, इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचा मानसन्मान उंचावण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असून आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कृष्णा भीमा विकास आघाडीचे संस्थापक तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी केले.
इंदापूर शहरातील शहीद भगतसिंग चौकात कृष्णा भीमा विकास आघाडीची प्रचार समारोप सभा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेस विजयी संकल्प सभा असे संबोधण्यात आले. या सभेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदीप गारटकर पुढे म्हणाले, आम्ही राजकारणाबरोबरच समाजकारण, कार्यकर्ते तसेच पक्षसंघटनेला देखील महत्व देतो. या जीवावर आम्ही जिल्ह्यात सर्वाधिक आमदार व खासदार निवडून आणले. जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात माझे मत विचारत घेतले गेले मात्र माझ्या इंदापूर शहर नगरपरिषद निवडणुकीत माझे मत डावलण्यात आले. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची चांगली घसटण दिसून आली. रक्त आटवून पक्ष संघटना वाढवली मात्र नेत्यांनी आम्हाला डावलले. या अनिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. दत्तात्रय भरणे हे योगायोगाने आमदार झाले, त्यांना सर्व आयतेच मिळाले. त्यामुळे त्यांना संघटनेची किंमत नाही. त्यांची कुवत देखील नाही. आपल्याला उद्या प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून माझा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या निवडणुकीत इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व पक्षाचे लोक एकत्र आलो आहोत. राजकारणातील अपप्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी आम्ही सर्व पक्षाचे लोक एकत्र काम केले असून आमचा विजय निश्चित आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी संदेश असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ही निवडणूक नगरपरिषदेची असून आपले कार्यक्षम उमेदवार प्रदीप गारटकर आहेत मात्र टीका हर्षवर्धन पाटील यांच्यावर होत आहे. सत्ता आमची, आमचे सरकार, त्यामुळे आम्ही म्हणेल तेच होईल हा भ्रम मोडून काढण्याची संधी आपणा सर्वांना मिळाली आहे. त्यामुळे आपल्या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे कार्यक्षम उमेदवार प्रदीप गारटकर व पॅनेल च्या सर्व उमेदवारांना विजयी करा. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा संदेश सर्वत्र जाऊ द्यात, तीन डिसेंबर ला गुलाल आपलाच आहे !
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, आम्ही खाजगी साखर कारखाना सहकारी बनवला, शेतीला पाणी दिले, बंधारे बांधले, २५ सब स्टेशन उभे केले, खडकवासल्याचे निमगाव परिसरात २२ गावांना नमुना नंबर सर वर पाणी दिले, दुधसंघ, कारखान्यांच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तन केले. आर्थिक संस्था तुमच्या ताब्यात असल्याने तुम्ही आमची अडवणूक केली. त्यामुळे कर्मयोगी कारखाना चालवायला द्यावा लागला. मात्र तुमच्या ताब्यातील छत्रपती कारखान्यावर १२ वर्षात ६०० कोटी रुपयांचे कर्ज झाले, या बोर्डावर कृषी मंत्र्याचे नाव देखील नाही. छत्रपती बाजार, बारामतीची सूतगिरणी कुणी बंद पाडली याचे उत्तर अजित पवार यांनी द्यावे असा प्रती सवाल त्यांनी केला. भीमा नदीच्या पुलावरून मामा यांना किती कमिशन मिळाले, मात्र तो मामा कोण आहे हे तुम्हाला माहीत असल्याचे सांगत त्यांनी लाइव्ह कमेंट वरून मंत्री भरणे यांच्यावर उपरोधिक टीका केली.
यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने म्हणाले, इंदापूर ही हिऱ्याची बाजारपेठ आहे का दुबई ची आहे. त्यामुळे भीमा नदीवरील पुलाची चर्चा होत आहे. हा पूल करण्यामागे राज्याचे सर्वात हुशार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा, भरणेमामा यांचा तसेच भरत शहा यांचा उद्देश वेगवेगळा आहे. अजित पवार यांच्या कारखान्यास ऊस मिळण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार आहे असे म्हणताच सभेत हशा पिकला. प्रदीप गारटकर व पॅनेलचा विजय निश्चित असल्याचे सूतोवाच करत त्यांनी विकासावरून मंत्री दत्तात्रय भरणे यांची नक्कल केली.
यावेळी मोहोळचे माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने, अनिल राऊत, ॲड. आशुतोष भोसले, अक्षय शिंदे, समीर देशमुख, विठ्ठलराव ननवरे, उमाताई इंगुले, ॲड. गिरीश शहा, कृष्णाजी ताटे यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन संजय शिंदे यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा