Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

*इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कोण होणार यासंदर्भात इंदापूरात पैजा, रविवारी दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षित !*

 *सहसंपादक-- डॉ.संदेश शहा (इंदापूर)*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो :-9922419159*



-----------------------------------------------------------------


संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या इंदापूर नगरपरिषद पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजे पर्यंत निश्चित लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व कृष्णा भीमा विकास आघाडी यामध्ये अत्यंत चुरशीची ही निवडणूक झाली. आघाडीचे उमेदवार तसेच माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार तथा माजी उपनराध्यक्ष भरत शहा यांच्या मध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत. श्री. गारटकर यांचे समर्थक ७५० मताने तर भरत शहा यांचे समर्थक १५०० मताधिक्याने निवडून येण्याचा दावा करत आहेत.            

                                ---: एडवर्टाइज:---👇


                                                            त्यामुळे दोन्ही बाजूने गुलाल आपलाच म्हणून विजयाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे इंदापूरचा कारभारी कोण होणार याची प्रचंड उत्सुकता राजकीय धुरीण यांच्या सह समर्थक व नागरिक यांच्या मध्ये आहे. त्यामुळे भरत शहा जायंट किलर ठरणार की प्रदीप गारटकर आपल्या नेत्यांना धडा देणार याची चर्चा शहरात सर्वत्र रंगली आहे ! 



इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने केलेल्या निवडणूक पूर्व सर्व्हे मध्ये भरत शहा विजयी होणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा त्यांना पक्षात घेण्यास विरोध नव्हता मात्र त्यांना पक्षात घेतल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यास त्यांचा विरोध होता. पुढील राजकारण व निवडणुका लक्षात घेता मराठा समाजास नगराध्यक्ष पद देण्याची त्यांची इच्छा होती.

 त्यातून त्यांचे व पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मतभेद होऊन पुढे मोठे राजकीय रामायण, महाभारत घडले. श्री. गारटकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वसामान्यांसाठी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आवाज उठविण्याचे ठरवले. त्यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा नारा देत पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरुद्ध संघटन केंद्रबिंदू मानून पक्षाविरुद्ध बंड केले. नेमके याच वेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने, मोहोळ चे माजी आमदार तथा भाजप नेते यशवंत माने व जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी प्रदीप गारटकर यांना पाठिंबा दिल्याने सर्वांची मजबूत कृष्णा भीमा विकास आघाडी तयार झाली.          

                                                             तर दुसरीकडे भरत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करून नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळवले. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा यांच्या नेतृत्वाखाली भरत शहा यांनी ही निवडणूक लढवली. सुरवातीस धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा श्री. गारटकर यांचा नारा होता तर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरासाठी दिलेला कोट्यावधी रुपयांचा विकास निधी, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेला शहराचा विकास, स्वच्छ भारत अभियानात सलग पाच वर्ष राष्ट्रीय पातळीवर झळकवलेले इंदापूर शहराचे नाव तसेच इतर कामे या जोरावर भरत शहा यांनी ही निवडणूक लढवली. शेवटच्या टप्प्यात मात्र ही निवडणूक प्रदीप गारटकर व भरत शहा यांच्यात न रहाता ही निवडणूक प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील, दशरथ माने, यशवंत माने, प्रवीण माने विरूद्ध अजित पवार, दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा अशी झाली. श्री. गारटकर यांच्यासह हर्षवर्धन पाटील, दशरथ माने, यशवंत माने, प्रवीण माने, सौ. अंकिता पाटील ठाकरे, सौ. अनुराधा गारटकर, विठ्ठलराव ननवरे यांनी कृष्णा विकास आघाडी साठी स्टार प्रचारक म्हणून काम केले तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, मंत्री भरणे यांच्या  सुविद्य पत्नी सौ. सारिका भरणे, पुत्र श्रीराज भरणे, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, सौ. अंकिता शहा, मुकुंद शहा, हनुमंत कोकाटे, ॲड रामकृष्ण मोरे यांनी भरत शहा यांच्यासाठी स्टार प्रचारक म्हणून काम केले. मागील निवडणुकीत सौ. अंकिता शहा या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या काँग्रेस पक्षाच्या पॅनेल मधून विजयी झाल्या होत्या मात्र नंतर त्यांच्यात राजकीय मतभेद झाले तसेच दोघेही काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यामुळे आपल्या विरोधकांचे शत्रू ते आपले मित्र या तत्वाने ही निवडणूक पार पडली. त्यामुळे जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती राजकीय हेतूने एकत्र आल्याने आगामी सर्व निवडणुकामध्ये हा संघर्ष तीव्र होणार आहे. त्यामुळे मिनी आमदारकीची समजली जाणारी ही निवडणूक रंगतदार झाली. सर्व राजकीय मित्र वेगवेगळ्या बॅनरखाली एकत्र आल्याने ही निवडणूक सर्वांच्या प्रतिष्ठेची तसेच अस्तित्वाची ठरली आहे. या निवडणुकीत मोठे अर्थकारण झाले असून एका मतासाठी दोन्ही बाजूकडून किमान पाच ते सहा हजार रुपये भाव दिल्याची चर्चा असून त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. काही मतदारांनी दोन्ही बाजूचे पैसे घेतले असून दोन्ही पक्षांना घरातील निम्मे निम्मे तसेच नगरसेवक यांच्याशी पॅनेल टू पॅनेल मतदान न करता आपल्या आवडत्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याने निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर करताना राजकीय किंगमेकर यांची दमछाक झाली आहे. त्यामुळे निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लाग

ले आहे.

दरम्यान निवडणूक मतमोजणी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली 


इंदापूर शहरास उजनी धरणातील प्रदूषित पाण्याऐवजी खडकवासला, वीर, भाटघर धरणातील तरंगवाडी तलावात येणारे पाणी पिण्यास मिळावे, इंदापूरकर यांच्यावर लागलेली शास्ती तसेच झालेल्या विकास या तीन मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली. इंदापूर येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश जकाते व सुरेश मिसाळ यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यामुळे शहरात कॅथ लॅब होणे अत्यंत गरजेचे आहे.                                             

 शहरातील नित्याची वाहतूक कोंडी, पार्किंग झोनची अंमलबजावणी, सांस्कृतिक सभागृह, भार्गवराम बगीच्याचा सर्वांगीण व्यापारी पद्धतीने विकास, मालोजीराजे गढी संवर्धन व शिवसृष्टी, सुफी संत चांदशाहवली बाबा दर्गा संवर्धन, शहरात सार्वजनिक ठिकाणी सुसज्ज स्वच्छतागृह, शहरात लघुउद्योग यांना चालना,  सुसज्ज भाजी मंडई व भाजीपाला मार्केट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, युवती व महिला सक्षमीकरण करण्यासाठी अस्मिता भवन, भुयारी गटारे, तंदुरुस्त रस्ते, जिल्हा परिषद शाळांच्यासाठी सुसज्ज इमारती, योग भवन, पत्रकार भवन या बाबींकडे निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे. खरे तर इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रदीप गारटकर व भरत शहा यांनी एकत्र येणे गरजेचे होते मात्र त्यांच्यात पुन्हा दुसऱ्यांदा राजकीय संघर्ष झाला आहे. मात्र भविष्यात या दोन्ही कुटुंबांनी शहर सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लब प्रमाणे एकत्र येणे ही काळाची गरज आहे, अशी चर्चा इंदापूरकर यांच्यामध्ये आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा