Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

तुळजापुरात गुटख्याचा खुलेआम सुळसुळाट; कारवाईच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा – 31 जानेवारीला आंदोलन”

 *मुख्यसंपादक -हुसेन मुलाणी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*

  *मो:-9730867448*


         
               *प्रतिकात्मक छायाचित्र*👆

तुळजापूर शहर व तालुक्यात गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विक्री व वाहतूक सुरू असून, यावर संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर हे धार्मिक व तीर्थक्षेत्र असल्याने येथे राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, अशा पवित्र नगरीत गुटख्यासारख्या घातक पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागासह शहरी परिसरातही गुटख्याचे मोठे गोडाऊन कार्यरत असून, त्यामधून राजरोसपणे विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतानाही केवळ कागदोपत्रीच कारवाई होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तुळजापूर तालुक्यात आजही मोठ्या प्रमाणावर गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. गुटख्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामागे काही अधिकारी व कर्मचारी गुटखा माफियांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहेत का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, येत्या १५ दिवसांच्या आत तुळजापूर तालुक्यातील सर्व गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समितीच्या वतीने अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धाराशिव येथे दिनांक 31 जानेवारी २०२६ रोजी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच संबंधित पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

तुळजापूरसारख्या धार्मिक नगरीतील नागरिकांनी व सामाजिक संघटनांनीही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा