Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ जानेवारी, २०२६

**गाव एकवटले… शाळा उजळली!* *राजुरीत शिक्षणासाठी* *लोकसहभागाचा जिवंत आदर्श; नूतन समितीकडून १ लाख ७७ हजाbरांचा निधी*

 *करमाळा-- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, ती गावाचं भविष्य घडवणारी पायाभरणी असते…”

ही भावना प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे करमाळा तालुक्यातील राजुरी गावाने. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत १ लाख ७७ हजार रुपयांचा निधी उभा केला आणि ग्रामीण शिक्षणासाठी लोकसहभागाचा आदर्श निर्माण केला आहे.

नुकत्याच झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनानंतर नूतन पदाधिकारी व सदस्यांनी पदाची जबाबदारी स्वीकारताच पहिला निर्णय शाळेच्या हिताचा घेतला. “सरकारी शाळा म्हणजे आमचीच शाळा” ही भावना मनाशी बाळगून समितीने स्वखर्चातून निधी संकलनाचा निर्णय घेतला आणि काही दिवसांतच तो प्रत्यक्षात उतरवला.

या उपक्रमात समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब निरगुडे यांनी पुढाकार घेत ७१ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या कृतीमुळे इतर सदस्यांनाही प्रेरणा मिळाली. उपाध्यक्ष रेश्मा पवार यांनी ५१ हजार रुपयांची भरीव मदत करत महिला नेतृत्वाचा ठसा उमटवला.

यानंतर सदस्य गोकुळ साखरे (१६ हजार), उद्योजक संतोष काका कुलकर्णी (११ हजार), सचिन सराटे (१० हजार) आणि काकासाहेब दुरंदे (१० हजार) यांनी शाळेच्या विकासासाठी आपापला वाटा उचलला.

या प्रवाहात महिला सदस्यही मागे राहिल्या नाहीत. अर्चना दुरंदे, मोहिनी शिंदे, स्वाती शिंदे आणि कोमल गरुड यांनी प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत देत “शिक्षण हीच खरी गुंतवणूक” असल्याचे दाखवून दिले.

हा उपक्रम केवळ पैशापुरता मर्यादित राहिला नाही, तर सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला. देशसेवेचा अभिमान असलेले मेजर अनिल साखरे यांनी ११ हजार रुपयांची मदत देत शाळेच्या कार्यात सहभाग नोंदवला. तर ग्रामपंचायत सदस्या डॉ. विद्या दुरंदे यांनी “विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी हीही समाजाचीच आहे,” असे म्हणत पुढील काळात मोफत आरोग्य सेवा देण्याची घोषणा केली.

शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पानसरे भावूक होत म्हणाले,

“हा निधी म्हणजे केवळ रक्कम नाही, तर ग्रामस्थांनी शाळेवर दाखवलेला विश्वास आहे. ‘गावाला शाळेचा अभिमान’ ही भावना राजुरीत जिवंत आहे.”

शिक्षकवृंदांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, या निधीतून शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी नियोजनबद्ध कामे केली जातील, असे सांगितले.

या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास राजेंद्र भोसले, सतीश शिंदे, उदय साखरे, शिक्षक दिलीप बोराडे, बबन रोडे, चंद्रकांत ढवळे, गजेंद्र कुदळे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक अंकुश सुरवसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुभाष पानसरे यांनी केले.

आज अनेक ठिकाणी सरकारी शाळा टिकवण्यासाठी संघर्ष सुरू असताना, राजुरी गावाने शाळेला आपल्या हक्काची आणि अभिमानाची जागा दिली आहे.

समाज आणि शाळा जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ग्रामीण शिक्षणाचा चेहरा बदलू शकतो—हेच राजुरीने कृतीतून दाखवून दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा