*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जेऊर ता. करमाळा येथील एका कार्यक्रमात करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील व माढा मतदार संघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील हे एकत्र उपस्थित राहणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी दिली. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की जेऊर ता. करमाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा सोहळा दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार नारायण आबा पाटील यांच्या निमंत्रणास मान देऊन माढा मतदार संघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील हे आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. या दोन्ही आमदार महोदयांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी आमदार बबनदादा शिंदे यांची अनेक वर्षाची सत्ता उलथवून टाकून विजय संपादन केला तर आमदार नारायण आबा पाटील यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा सतरा हजार मतांच्या फरकाने पराभव करत दुसऱ्यांदा आमदार म्हणुन करमाळा मतदार संघाचा पदभार स्विकारला आहे. एक नवीन राजकीय इतिहास घडवलेले हे दोन आमदार विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर करमाळा तालूक्यात प्रथमच एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे आमदार नारायण आबा पाटील व आमदार अभिजीत पाटील यांना माढा तालुक्यातील मतदारांनी भक्कम पाठींबा देत निवडुन दिले आहे. करमाळा विधानसभा मतदार संघास माढा तालुक्यातील कुर्डुवाडी सह छत्तीस गावे जोडलेली आहेत. तर आमदार अभिजीत पाटील हे माढा मतदार संघातुन निवडुन आले आहेत. आजचा कार्यक्रम हा शैक्षणिक कार्यक्रम असल्याने या व्यासपीठावर राजकीय विषय येणार नाही. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना या दोन लोकप्रतिनिधींची एकत्र उपस्थिती माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांना मात्र प्रोत्साहन देणारी असणार आहे. आज दुपारी दोन वाजता भारत हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात हा भव्य शैक्षणिक सोहळा पार पडणार असुन संस्थेचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया व सर्व संचालक हे मान्यवरांचे स्वागत करणार आहेत तर संस्थेचे सचीव प्रा अर्जुनराव सरक हे संस्थेचा शैक्षणिक अहवाल सादर करणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा