*प्रतिनिधी --एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील २३०६ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा अकलूजच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांचे मार्गदर्शनाखाली आज अकलूज येथे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ व नायब तहसीलदार अमोल कदम यांनी प्रशिक्षण दिले.
स्मृतीभवन,यशवंतनगर(अकलूज),(ता.माळशिरस) येथे आज शनिवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणात सर्व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दृक श्राव्य पद्धतीने चलचित्रफितीद्वारे दोन सत्रात माहिती देण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ व निवासी नायब तहसिलदार अमोल कदम यांनी प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन केले.
मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मतदान कर्मचाऱ्यांनी करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे महर्षि प्रशाला,यशवंतनगर येथे ५० झोनल ऑफिसर व ग्राम महसूल अधिकारी यांनी मतदान कर्मचाऱ्यांना बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट या
मशिन हाताळणीचे(हॅन्डस ऑन) प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी कर्मचाऱ्यांचे गट करून २५ क्लास रूम पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आदर्श
आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले.
यावेळी निवासी नायब तहसिलदार अमोल कदम, माळशिरसच्या गटशिक्षणाधिकारी स्वरा महामुनी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर,निवडणूक नायब तहसिलदार प्रवीण सुळ, महसूल तहसीलदार सिद्धनाथ जावीर, पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे, सहाय्यक महसूल अधिकारी अजित जाधव, चंद्रकांत भोसले, सर्व मंडल अधिकारी तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक यांसह इतर निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणावेळी मतदान अधिथकारी व कर्मचारी यांना चहा,पुरी भाजी नाश्ताची सोय करण्यात आली होती.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा