Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ जानेवारी, २०२६

*बाप म्हणावा की सैतान! शेतात नेलं अन् पोटच्या जुळ्या मुलांना संपवलं; बार्शीपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी आवळल्या मुसक्या!*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


करमाळा तालुक्यातील केत्तूर गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक हृदयद्रावक घटना उजेडात आली आहे. एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या २ चिमुकल्या जुळ्या मुलांना विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतला. शिवांश जाधव आणि श्रेया जाधव अशी या दुर्दैवी ६ वर्षांच्या मुलांची नावे आहेत. सुहास जाधव असे या निर्दयी पित्याचे नाव असून, त्याने हिंगणी हद्दीतील शेतात नेऊन दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून दिले. या घटनेने संपूर्ण करमाळा तालुका हादरून गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने पळून गेला

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून किंवा किरकोळ कारणावरून रागाच्या भरात सुहासने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर त्याने स्वतः घरी फोन करून या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने स्वतः देखील कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी तिथून दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने पळून गेला होता, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून नोकरीला

मृत शिवांश आणि श्रेया हे दोन्ही भाऊ-बहीण केत्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ली मध्ये शिकत होते. आरोपी सुहास जाधव हा झरे येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून नोकरीला होता. जाधव कुटुंबाकडे बागायत शेती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आपल्या पश्चात मुलांचे काय होईल, या विचारातून त्याने मुलांना विहिरीत ढकलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.



खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला

दरम्यान, या प्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका सुशिक्षित आणि जबाबदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्याच पोटच्या मुलांसोबत असा क्रूर व्यवहार केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा