*सहसंपादक -डॉ. संदेश शहा (इंदापूर)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9922 419 159*
देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून सर्वसामान्य शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन विविध उपक्रम प्रभावीपणे राबवित आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयासोबतच सिंचन, पशुपालन यासारखे पूरक विभाग तसेच देशातील कृषी विज्ञान केंद्रे देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहेत. विकसित भारत – जी रामजी’ योजनेअंतर्गत शेती पूरक कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सहाय्यक महानिदेशक डॉ. राजश्री रॉय बर्मन, कृषी प्राद्योगिकी अनुसंधान संस्थान व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे संचालक डॉ. एस. के. रॉय, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नायकवाडी, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितिन ठोके हे मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. चौहान पुढे म्हणाले, “प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आम्ही देव पाहतो. अन्नदाता शेतकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा असून विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी शेतकरी कष्ट करून जे उत्पादन घेतात, ते कोणतेही मशीन, ए.आय. किंवा रोबोट निर्माण करू शकत नाही.” त्यामुळे
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी प्रक्रिया केंद्रे ( प्रोसेसिंग युनिट्स ) उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे सूतोवाच त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना व उपक्रम अस्तित्वात असले तरी काही शेतकऱ्यांपर्यंत त्यांची संपूर्ण माहिती पोहोचत नाही, तसेच काही योजनांना मर्यादा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतमालावरील प्रक्रिया केंद्रे तसेच इतर शेतीविषयक प्रश्नांबाबत राज्य शासनाशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
लहरी हवामान, कमी क्षेत्रफळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शेतीत पिकांसोबत पशुपालन, कुक्कुट पालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फळे, फुले व भाजीपाला यांसारख्या विविध पूरक व्यवसायांची सांगड घालण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
यावेळी नामदार श्री. चौहान यांच्या हस्ते मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘यश मायक्रो-न्यूट्रिएंट्स ग्रेड–२’ या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त कृषी खाद्य उत्पादनाचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त आयोजित महिला स्वयंसहायता बचत गट तसेच शेतीविषयक विविध स्टॉल्सना भेट देत त्यांनी महिला व शेतकरी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात बहावा वृक्षाचे रोपण करण्यात आले.
केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांच्या प्रत्यक्ष भाषणा पूर्वी पेठ येथील यशवंत गावंडे ( शेतीमाल प्रक्रिया केंद्रे ), जानोरी येथील गणेश वाघ ( फुलबागा शीतगृह अनुदान ), नाशिक येथील रवींद्र अमृतकर ( शेतीतील यांत्रिकी करणाचे लाभ ) तसेच अजमेर सौंदाणे येथील नानाभाऊ पवार ( कांदा पीक ) यांनी आपापल्या विषयांवर मंत्री महोदयांशी संवाद साधत या व्यवसायातील अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माजी विद्यार्थिनी व यशस्वी मशरूम उद्योजिका श्रीमती वैशाली उदार यांचा केंद्रीय मंत्री श्री. चौहान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले. त्यांच्या हस्ते मंत्री श्री. चौहान यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. डॉ. शाम कडूस पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शेतकरी, महिला बचतगट सदस्य तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा