*सहसंपादक -डॉ. संदेश शहा (इंदापूर)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9922 419 159*
जगात सर्वाधिक युवा पिढी भारत देशात असून ही पिढी भविष्यात देशाचे जबाबदार नागरिक होणार आहेत. त्यामुळे या पिढीचे मन, मेंदू आणि मनगट मजबूत असेल तरच देश जागतिक महासत्ता होवू शकतो. त्या पार्श्वभूमीवर
व्यसनमुक्त युवक संघाचा सलग पंधराव्या वर्षी दारू नको, दूध प्या हा विधायक उपक्रम आदर्श व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.
देशातील युवा पिढी व्यसनमुक्त व सामर्थ्यवान असावी या उदात्त हेतूने जेष्ठ किर्तनकार युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सलग १५ व्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या हा अनोखा विधायक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इंदापूर शहर आणि परिसरातील गलांडवाडी, वरकुटे बुद्रुक, वडापुरी, नरुटवाडी त्याचबरोबर इतर गावातील ५५० युवक व नागरीकांनी सहभाग घेतला. यावेळी
उपस्थित नागरिकांना लोणी देवकर येथील रचना देशी गो संवर्धन केंद्र यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी गलांडवाडी नं. १ येथील राजीवप्रताप निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉ. प्रताप कदम यांच्या वतीने व्यसनमुक्त युवक संघाची शिवतेज ही दिनदर्शिका उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आली.
नगराध्यक्ष भरत शहा पुढे म्हणाले, घरातील, समाजातील काही ज्येष्ठ नागरिक हे युवापिढी समोर व्यसन करत असल्याने त्यांचे अनुकरण करत शालेय मुले देखील व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. ज्या देशाची युवा पिढी सशक्त, बलशाली असेल तितका तो देश सामर्थ्यवान आणि बलशाली मानला जातो. भारत मातेचे काही युवक पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करत असून दिनांक ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी दारू पिण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्त युवक संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे ही काळाची गरज आहे.
यावेळी शालेय शिक्षण आणि योग क्षेत्रामध्ये अनमोल कार्य करणाऱ्या योगरत्न पुरस्कार प्राप्त दत्तात्रय आनपट, विजय नवल पाटील, राज्यस्तरीय शालेय शिक्षक योगासन स्पर्धेसाठी निवड झालेले प्रशांत गिड्डे व प्रा. धनंजय देशमुख तसेच इंदापूर नगरपरिषदेचे नूतन अध्यक्ष भरत शहा तसेच नवानिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली, गोविंद वृद्धाश्रमाचे अध्यक्ष हभप दशरथ महाडिक, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा, माजी सैनिक संघटनेचे मारुती मारकड, कैलास गवळी, वृक्ष संजीवनी परिवाराच्या संस्थापिका सायरा आतार,मयुराताई पाटील, सारिका रेडके, रचना परिवाराचे माजिद भाई पठाण, व्यसनमुक्त युवक संघाचे डॉ. सुदीप ओहोळ, तानाजी पांडुळे, बापू गलांडे, विकास खिलारे, माजी मुख्याध्यापक नवनाथ चंदनशिवे आधी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अस्लम शेख, गणेश कांबळे, ज्ञानदेव डोंगरे, इंद्रनील देशमुख, मंथन माने, सौरव पारवे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. धनंजय देशमुख यांनी तर सूत्रसंचालन कुस्ती पंच शरद झोळ यांनी केले. आभार प्रदर्शन युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताप यांनी केले.
चौकट : प्रा. धनंजय देशमुख यांनी जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकत्र करून हा उपक्रम राज्यात सर्वत्र पोहोचवला. या उपक्रमात लोणी देवकर येथील रचना देशी गो संवर्धन केंद्र संचालक माजीदभाई पठाण हे वडील रज्जाकभाई पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष देशी गाईंचे दूध वाटप करण्याचा उस्फुर्त उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता संवर्धित होत असून युवापिढी मध्ये पौष्टिक दूध पिण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा