*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
काल दुपारी अचानक वाईट बातमी आली.. केत्तुरच्या एका बापाने दोन चिमुरड्या मुलांची हत्या करून स्वतःही विष प्राशन केले. क्षणाधार्त डोळ्यासमोर काजवे चमकावे असे झाले. व्हॉटसॲप ग्रुपवर दोन चिमुकल्यांचे फोटो पाहुन खुप गहीवरलो.. डोळ्यांच्या कडा क्षणार्धात पाणवल्या... पण खरा धक्का बसला जेंव्हा समजले हे सुहासने कृत्य केलय!.. सुहास ज्ञानदेव जाधव हा एक साधा सरळ असलेला मुलगा होता. हिंगणीला शेती,वडील रिटायर माणुस,आई व पत्नी गृहीणी, एकुलती एक विवाहीत बहीण ती वकीलीचे क्षेत्रात बारामतीला.. स्वतः सुहास झरे ता करमाळा येथे विज मंडळाकडे कामाला.. सर्व काही टुमटुमित असताना त्याने हे अमानुष कृत्य का केले?.. पोटच्या दोन लहान जुळ्या मुलांना का मारले असेल?.. सर्व काही आज तरी अनुत्तरीत आहे. ही घटना केत्तुर व परिसरातील नाही तर संपूर्ण करमाळा तालुक्याला हादरवणारी आहे. माणसाला कितीही आणि कसलेही टेन्शन असु द्या.. पण एवढी क्रुरता.. एवढी अमानुषता कशासाठी? काय केलं होत या निष्पाप जीवांनी? सुहास तुझ्या हातुन नव्हते हे कृत्य घडायला पाहिजे. का आणि कशासाठी हे आम्हाला कालांतराने कळेलही. कितीही कसलेही टेन्शन असु दे,पण या लहान लेकरांची अशा प्रकारे निर्घुण हत्या नव्हती करायला पाहीजे. आज प्रत्येक माणूस हळहळतोय.. आई आणि बाप हे लेकरांचे श्वास असतात आणि लेकरांचेही आई बापावर प्रचंड विश्वासाचे नाते असते. ही दोन्ही लेकरे विश्वासानेच या बापाबरोबर शेतात गेली.पण नियतीला काही तरी वेगळेच घडणारे होते.जे घडले आहे ते अघटीत आहे, आणि अतिशय क्रुरतेने केलेले हे कृत्य आहे.सुहास असा निष्ठुरपणे का वागला हे त्यालाच माहीत, शांत संयमी असणाऱ्या सुहासला कशाचा प्रचंड ताण होता? माणुस ताणतणावात असला की त्याचे हातुन असे काही भयानक प्रकार घडतात याची कित्येक उदाहरणे आहेत.पण हा प्रकार केत्तुरमधे घडल्यामुळे सर्वजण निशब्द झाले आहेत. या कुटुंबातील एका अविचारी बापाने क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले. काय म्हणले असतील बिचाऱ्या त्या लहान लेकरांचे जीव.. तिथली घटना जसजशी ऐकायला मिळतेय ते ऐकुन मनाला प्रचंड धक्का बसला आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. घराघरात कुटुंबात एकवाक्यता आवश्यक आहे. समाधानाची व्याख्या ज्याने त्याने ठरवायची असते.कौटुंबिक कलह,वाद,आर्थिक जबाबदाऱ्याचा ताण, नात्यामधील दरी, संशयीवृत्ती, व्यसनाधिनता अशा अनेकविध कारणांमुळे माणूस तणावात राहतो. अशा ताणतणावातूनच असे प्रकार घडत असतात. सुहास सारख्या एका सरळ मार्गी जगणाऱ्या बापाने हे कृत्य कोणत्याही कारणाने करू दया परंतु हे मानव जातीला आणि बाप लेकराच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारे आहे.अवघी पाच सहा वर्षाची असणारे हे कोवळे जीव आज चिरशांती घेऊन अनंतात विलिन झाले आहेत. केत्तुर आणि परिसरात नीरव शांतता पसरली आहे. जे झाले त्याचे दुःख कायमच राहील मात्र अशा घटना समाजात परत कधीही घडु नयेत यासाठी प्रत्येकाने ताणतणावमुक्त राहण्यासाठी व अविचारा पासुन दुर राहुन संयमी राहण्याचे ठरविले पाहिजे!! दोन्ही बाळांना भावपुर्ण श्रद्धांजली!!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा