उपसंपादक- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
सामाजिक समतेचा आणि महिला सशक्तीकरणाचा दीपस्तंभ असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अस्मिता लोकांचलित सधन केंद्र महाळूंग अंतर्गत बचत गटाच्या महिलांनी अत्यंत उत्साहात व वेगवेगळ्या उपक्रमांतून साजरी केली. पारंपरिक कार्यक्रमांऐवजी महिलांनी विविध मनोरंजक व एकात्मतेला चालना देणारे खेळ घेत जयंतीला आनंदोत्सवाचे स्वरूप दिले.
या कार्यक्रमात संगीत खुर्ची, उखाणे, प्रश्नमंजुषा, अशा खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांमधून महिलांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि एकमेकांशी सुसंवाद वाढताना दिसून आला. विजेत्या महिलांना प्रतीकात्मक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व, स्त्री स्वावलंबन आणि समाजपरिवर्तनात महिलांची भूमिका यावर उपस्थित महिलांनी मनोगत व्यक्त केले.
“सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाच्या प्रकाशामुळे आज आम्ही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत,” असे भावनिक उद्गार अनेक महिलांनी काढले.
हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता, महिलांमधील एकजूट, आनंद आणि सशक्तीकरणाचा उत्सव ठरला.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा