*अकलूज ---प्रतिनिधी*
*एहसान. मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
विद्यार्थी हेच आई-वडील, समाज, अन देशाचे भविष्य असून सर्वगुण संपन्न व सक्षम पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करून देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल असे मत निर्भया पथक अकलूजचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान देशमुख यांनी येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, माळीनगर येथील भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक रितेश पांढरे, अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, माळीनगर येथील डॉ. फारुक शेख, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी हे उपस्थित होते.
श्री.देशमुख यांनी निर्भया पथकाचे कामकाजाबाबत थोडक्यात माहिती सांगून महिलांच्या सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी त्यासाठी असणारे विविध कायदे याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच हेडकॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर यांनी महिलांविषयीचे गुन्हे, सायबर क्राईम, मोबाईलसह सोशल मीडियाचा अतिरेकी वापर व त्याचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
पुढे बोलताना श्री.देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्काराची नितांत गरज असून त्यांच्याकडे शिस्त, संयम, संवेदनशीलता, नम्रता,विवेक,आदरभाव, प्रामाणिकपणा,कष्ट,संघर्ष करण्याची तयारी हे गुण असणे अत्यंत आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, शिक्षक व सन्माननीय व्यक्तींचा आदर राखण्याच्या सूचना दिल्या. तसेच चांगले मित्र व चांगल्या व्यक्तींचा सहवास हा जीवनाच्या वाटचालीसाठी कसा पूरक व प्रेरणादायी असतो हे पटवून दिले.
समाजातील विघातक प्रवृत्तीच्या लोकांपासून व सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देऊन छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सिंधुताई सपकाळ,कल्पना चावला, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा व्यक्ती आपले आदर्श असायला हवेत असे ते म्हणाले.
सह्याद्रीच्या कुशीतील महाराष्ट्राच्या महान भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत गोरोबा, संत सावता माळी हे थोर संत तसेच महापुरुष अनेक समाजसुधारकांच्या कार्य कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्मलो, वाढलो याबाबत कृत कृत्याची भावना आपल्या मनात सदैव असायला हवी.
शिक्षण,साहित्य,समाज सुधारण, संगीत,कल,क्रीडा इत्यादी क्षेत्रातून आपल्यापर्यंत आलेला वारसा जतन करून तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून मी काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने आपला देश समाज आणि कुटुंबासाठी योगदान देणे खूप आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपली आवड अन छंद जोपासून जगण्याची अभिरुची वाढवायला हवी,आपली संस्कृती,परंपरा, कायदे,नियम, हक्क व कर्तव्य यांचा मान राखून एक आदर्श व जबाबदार नागरिक बनवून देशाला पुढे घेऊन जाण्याचे आवाहन श्री.देशमुख यांनी केले.
शेवटी सहशिक्षक नवनाथ गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा