*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
बागल आणि शिंदे यांची युती मतदानाच्या आदल्या दिवशी तुटेल व हे दोन्ही गट मतदाना दिवशी स्वतंत्र दिसतील असा खळबळजनक दावा पाटील गटाकडून करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी करमाळा तालुक्यात राजकीय गट व पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. कालच बागल व शिंदे गटाची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रथमच माजी आमदार संजयमामा शिंदे, भाजपा नेत्या रश्मीदीदी बागल व दिग्विजय बागल एकत्रित दिसले. या पत्रकार परिषदेत बागल-शिंदे युतीने विजयाचा दावा केला आहे. यावर आज आमदार नारायण आबा पाटील गटाकडून प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील इतर गटांना पोखरुन आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले, यात प्रामुख्याने त्यांनी बागल गटातील कार्यकर्ते आपल्या गटात समाविष्ट करुन घेतले. यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी झालेली ही युती आपल्या गटासाठी वजाबाकी करणारी नसावी याची दक्षता बागल बहिण-भाऊ नक्कीच घेतील. या संपूर्ण पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या दिग्विजय बागल यांची देहबोली ही या युतीला सकारात्मक प्रतिसाद देणारी नव्हती. सुमारे सत्तावीस मिनीटाच्या या पत्रकार परिषदेत दिग्विजय बागल हे वेगळ्याच विचारात गुंतलेले दिसुन येत होते.
कदाचित आजची ही एका आठवडाभराची युती २०२९ च्या विधानसभा निवडणूकीसाठी आपल्याला तोट्याची ठरणार हा विचार सतत त्यांच्या मनात घोळत होता. यामुळे ही युती निवडणुकीच्या अगोदर तुटणार हे निश्चित आहे. कदाचित प्रचार संपला की युतीही संपेल व मतदाना दिवशी हे दोन्ही गट आपल्या उमेदवारांची काळजी घेताना दिसुन येतील. केवळ आपल्याच स्वतःच्या गटातील उमेदवारांना मतदान करताना हे गट दिसून येणार आहेत. अल्पकाळाची ही युती पाटील गटासाठी कधीच वरचढ होऊ शकणार नसुन माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही अशी खात्री पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी बोलून दाखवली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा