*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्याचा सर्वांगीण व गतिमान विकास साधण्याच्या उद्देशाने आगामी २०२६ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती करण्यात आल्याची अधिकृत घोषणा माजी आमदार संजयमामा शिंदे व भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल यांनी केली. ही माहिती गुरुवारी (दि. २३) करमाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, बायपास रोड येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहमतीने ही युती निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून समान प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच भाजपच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह स्टार प्रचारकांच्या सभांचाही कार्यक्रम आखण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास वेगाने साधण्यासाठी, तसेच कार्यकर्त्यांना प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने ही आघाडी उभारण्यात आली असल्याचे नेत्यांनी सांगितले. ही युती केवळ राजकीय समीकरणापुरती मर्यादित नसून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठीच करण्यात आली असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. या युतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामे, नागरिकांच्या दैनंदिन समस्या तसेच लोकहिताची कामे मार्गी लागतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल म्हणाल्या, “ही युती मनापासून व विकासाच्या व्यापक दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनात विकासाबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. भाजप–राष्ट्रवादीची ही युती त्या अपेक्षांना पूर्ण करण्यास सक्षम आहे. त्यामुळे जनता निश्चितच या युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करेल आणि तालुक्यात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल.”
भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी सांगितले की, “करमाळा तालुक्यातील पायाभूत सुविधा, शेती विकास, रोजगारनिर्मिती तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी ही युती करण्यात आली आहे. विकासाभिमुख नेतृत्वाला जनता शंभर टक्के साथ देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
या संयुक्त पत्रकार परिषदेला माजी आमदार संजयमामा शिंदे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल, युवा नेते दिग्विजय बागल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, दशरथ घाडगे, निळकंठ देशमुख,ॲड. अजित विघ्ने, सुजित बागल, सतीश निळ, उपनगराध्यक्ष अतुल फंड, विनय ननवरे, प्रशांत पाटील, नानासाहेब मोरे, दादासाहेब जाधव,आशपाक जमादार, डॉ. विकास वीर राजेंद्र पवार तुषार जाधव विकास रोकडे यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी २०२६ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही युती करमाळा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार असून, विकासाच्या मुद्द्यावर आधारित ही आघाडी मतदारांचे लक्ष वेधून घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा