*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत राजकीय हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटना आपली महत्त्वपूर्ण भूमिका जाहीर करणार आहे. संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील येत्या २७ जानेवारी रोजी
माढा तालुक्यात आणि करमाळा तालुक्यात आपल्या संघटनेचा अधिकृत पाठिंबा कोणत्या पक्षाला किंवा उमेदवारांना देणार, याबाबत स्पष्ट भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जनशक्ती शेतकरी संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग तसेच वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढा देणारी संघटना म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांच्या उसाच्या थकीत बिलांचा प्रश्न असो, की अन्य शेतमालाच्या दराचा मुद्दा — प्रत्येक वेळी संघटनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासन व सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
विशेषतः उसाच्या थकीत बिलासाठी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, ट्रॅक्टर रॅली, मोर्चे अशा विविध आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्णायक लढे दिले गेले. या आंदोलनांमुळे अनेक ठिकाणी प्रशासनाला निर्णय घ्यावे लागले असून, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता.
दिव्यांगांच्या हक्कांसाठीही संघटनेने अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. विविध शासकीय योजना, अनुदाने व सवलती प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात संघटनेचा मोठा जनाधार निर्माण झाला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणाला मिळतो, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. संघटनेचा निर्णय हा निवडणुकीच्या समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २७ तारखेला होणाऱ्या जाहीर भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकारणात नवे वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोणता पक्ष किंवा उमेदवार ठोस भूमिका घेईल, त्यालाच पाठिंबा दिला जाईल, असे संकेत संघटनेच्या वर्तुळातून मिळत असून, त्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेचा निर्णय उत्सुकतेचा विषय ठरला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा