*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नसून ती संतांची, पंतांची, कष्टकऱ्यांची व सामान्य जनतेची भाषा आहे. समाजाला विचार, संस्कार आणि सर्वार्थाने परिपूर्ण करण्याचे महान कार्य मराठी भाषेने केले आहे. त्यामुळेच मराठी ही अभिजात भाषा तर आहेच पण त्याचबरोबर ती आपली सांस्कृतिक ओळख, वैचारिक बैठक आणि सामाजिक बांधिलकी आहे. असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले.
करमाळा येथील न्यायालयात तालुका विधीसेवा समिती व वकील संघ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधवाड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. चौधरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.पी.कुलकर्णी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वरिष्ठ न्यायाधीश संजय घुगे, न्यायाधीश अमित शर्मा तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राम नीळ उपस्थित होते
*वरिष्ठ न्यायाधीश यांनी प्रा.डॉ.संजय चौधरी यांचा सन्मान केला. सोबत न्यायाधीश एस्.पी. कुलकर्णी, न्यायाधीश अमित शर्मा*
.पुढे बोलताना प्रा. डॉ. चौधरी म्हणाले की, मराठी भाषेने समाजाला केवळ शब्दच दिले नाहीत, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत, कवयित्री बहिणाबाईंपासून शाहिरांपर्यंत या भाषेने सर्वांना समृद्ध केले आहे. अंभग,भारूड, पोवाडा,लावणी, कथा, कविता, नाटक, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांतून मराठीने सामान्य जनतेला भरभरून दिले आहे. ही भाषा कष्टकऱ्यांची आहे, विद्वानांची आहे, न्यायालयांची आहे आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी सर्वांगीण प्रयत्न केले पाहिजेत व या भाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश श्रीमती एस.पी. कुलकर्णी म्हणाल्या की, मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त आयोजित केलेले प्रा.डॉ. संजय चौधरी यांचे हे व्याख्यान अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी झाले. मराठी भाषेची बलस्थाने आणि न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचे महत्व त्यांनी अत्यंत सुरेख व ओघवत्या शब्दांत मांडले. हे विचार आपल्या सर्वांसाठी अनमोल आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक एस.एल. जाधव यांनी केले तर वरिष्ठ लिपीक राम खराडे यांनी आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा