*लोहारा धाराशिव-- प्रतिनिधी*
*यशवंत भुसारे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी उमेदवारांनी तिकीटासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारी मिळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मनधरणी, बैठका, भेटीगाठी आणि वशिलेबाजीला ऊत आला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती मतदारसंघांसाठी इच्छुकांची संख्या प्रचंड असून, तिकीट नेमके कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ नेते मंडळींच्या बंगल्यांपासून पक्ष कार्यालयांपर्यंत तिकीटासाठी शिफारशी करणाऱ्यांची गर्दी वाढली असून, ज्याच्याकडे वजनदार वशिला त्याच्याकडे तिकीट अशीच स्थिती निर्माण झाली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा थेट सामना रंगणार असून, पैसा, प्रतिष्ठा आणि पक्षनिष्ठेची कसोटी लागणार आहे. अनेक नवखे उमेदवार धनबळाच्या जोरावर संधी मिळविण्याच्या प्रयत्नात असताना, जुने निष्ठावंत कार्यकर्ते व जेष्ठ पदाधिकारी मात्र डावलले जाणार नाहीत ना, याची धास्ती व्यक्त करत आहेत.
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांनी तिकीट वाटप करताना वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या जेष्ठ पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्त्यांना पहिले प्राधान्य द्यावे, अन्यथा योग्य वेळी वेगळा विचार केला जाईल असा सूचक इशारा काही नाराज कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे. त्यामुळे तिकीट वाटप करताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार हे निश्चित मानले जात आहे.
निवडणूक कार्यक्रमा नुसार १६ ते २१ जानेवारीदरम्यान अर्ज दाखल करणे, २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी, २७ जानेवारी रोजी अर्ज मागे घेणे, ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने इच्छुकांची धावपळ वाढताना दिसत आहे.एकूणच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, तिकीट वाटपातूनच आगामी राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात असुन या निवडणुकीत लोकशाही टिकवायची असेल तर लागेबंद लोकांचा वेळीच ताळेबंद हिशोब करा अशी मतदारातुन चर्चा आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा