*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष आणि सभापती पदांच्या निवडीकडे लागले आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आदेश निर्गमित केले असून, २० मार्च २०२६ पूर्वी या सर्व निवडी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पाडली आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा त्यांच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे या निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक आयोजित करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापतींची निवड करणे आवश्यक आहे.
*या १२ जिल्ह्यांत होणार हालचाली:**
ग्राम विकास विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
**सरकारचे आदेश काय?**
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी या १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची पहिली बैठक **२० मार्च २०२६** पूर्वी आयोजित करावी, असे स्पष्ट आदेश अवर सचिव बा. म. आसोले यांनी दिले आहेत.श
**राजकीय गणिते वेगाने फिरणार:**
या आदेशामुळे आता संबंधित १२ जिल्ह्यांत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार आणि सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या बैठकीची तारीख जाहीर होताच फोडाफोडीचे राजकारण आणि 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'लाही उधाण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा