यशवंतनगर --प्रतिनिधी
नाझिया. मुल्ला
टाइम्स 45 न्यूज मराठी
ज्ञान, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशाची सुवर्ण शिखरे गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिमानास्पद सत्कार महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंत नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील ओलंपियाड स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या तब्बल 66 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्रदान करून गौरवण्यात आले. सुवर्णपदकांनी दिमाखात झळकणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशालेचा यश मुकुटात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेच्या भव्य प्रांगणात आयोजित दिमाखदार समारंभात प्रशालेचे सभापती अॅड. नितीनराव खराडे व मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व प्रमाणपत्रे देण्यात आली. टाळ्यांच्या कडकडाटात आणि अभिनंदनाच्या गजरात विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
सायन्स ओलंपियाड फाउंडेशन दिल्ली आयोजित इंटरनॅशनल स्पर्धा परीक्षेत एकूण 426 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवून प्रशालेचा नावलौकिक वाढवला आहे . 34 विद्यार्थी सेकंड लेव्हल परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
परिश्रमाच्या पेरणीमुळे यशाची कापणी होते या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिज्ञासा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे यश संपादन केले असे मत प्रमुख अतिथी सभापती अॅड नितीनराव खराडे यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या पाठवायचे फलित आहे. शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा, सातत्यपूर्ण सराव व प्रेरणा दिल्यामुळेच हा सुवर्णक्षण अनुभवता आला असे त्यांनी नमूद केले.
ओलंपियाड स्पर्धा परीक्षा प्रमुख कल्पना जाधव यांनी जनरल नॉलेज इंग्रजी गणित या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत जागरूकता निर्माण केली व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्यासाठी प्रोत्साहित केले.
उपस्थित पालकांच्या डोळ्यात आपल्या पाल्यांनी राष्ट्रीय स्तरावर झेंडा रोवल्याचा अभिमान दिसत होता.
विद्यार्थ्यांनीही भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदर विद्यार्थ्यांना आसिफ झारेकरी, रूपाली दुरापे , प्राजक्ता पोखरे, नाझिया मुल्ला या शिक्षकांनी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुकसाना नदाफ यांनी केले. स्पर्धा परीक्षेतील अभूतपूर्व यशामुळे यशवंत नगर परिसरात शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून ज्ञानदीप अधिक तेजाने प्रज्वलित झाल्याची भावना व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा