*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाईम्स 45 न्यूज मराठी*
*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*
पुणे रुपीनगर येथील रहिवासी तसेच महाराष्ट्र राज्य पेंशनर्स असोसिएशनचे जामखेड तालुकाध्यक्ष ह.भ.प. रामायणाचार्य डॉ. संजय सिताराम गीते यांनी शिक्षण, साहित्य, कला, योग प्राणायाम, सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न, धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेऊन डॉ. गीते यांना विशेष जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे राज्य महाराष्ट्र चे अध्यक्ष एन.डी. मारणे यांनी केले. यावेळी अध्यक्ष श्री. मारणे यांच्या हस्ते डॉ. गीते यांना सन्मानचिन्ह, शाल तसेच श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या अधिवेशनात डॉ. गीते, श्री इथापे गुरुजी यांच्यासह राज्यातील ५८ सेवानिवृत्त शिक्षकांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार गजाननराव घुगे, हिंगोलीच्या उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भुते, मंदिर संस्थानचे सचिव द्वारकादास सारडा, नरसी नामदेव ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर राव, कीर्तनकार, पेन्शनर असोसिएशनचे राज्य कोषाध्यक्ष वसंतराव साबळे, सरचिटणीस सुभाष पवार, विभागीय उपाध्यक्ष वसंतराव सबनीस, अहिल्यानगर चे खासदार निलेश लंके यांचे पिता श्री. ज्ञानदेव लंके, अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनचे जेष्ठ मार्गदर्शक तसेच अहिल्यानगर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष द. मा. ठुबे, सरचिटणीस ब. द. उबाळे, दक्षिण विभाग प्रमुख ज्ञानदेव थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नरसी नामदेव ( जिल्हा हिंगोली ) येथे मंगळवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त शिक्षकांचे अधिवेशन संपन्न झाले. हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र नरसी नामदेव येथे महाराष्ट्रातील थोर संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीत मंदिर प्रांगणात भव्य मंडप उभारून पुणे व हिंगोली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात महाराष्ट्रातून दोन हजार सेवानिवृत्त शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे राज्य महाराष्ट्र चे अध्यक्ष एन. डी. मारणे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य विभागीय उपाध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिजामाता शिक्षण बहुउद्देशीय संस्था, हिंगोलीच्या सरचिटणीस पदावर ज्ञानदेव जगताप, भांडेगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हिंगोलीच्या उपजिल्हाधिकारी भुते यांचा सत्कार एन.डी. मारणे, द्वारकादास सारडा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतीक्षा भुते या मूळ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील शिवपट्टण ( खर्डा ) येथील असून त्या पोपट शंकर भुते या निवृत्त शिक्षकांच्या कन्या आहेत. राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील रुपीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक ह. भ. प. रामायणाचार्य डॉक्टर श्री संजय सिताराम गीते यांचा सेवा कार्यकाल अहिल्यानगर जिल्हा येथे झाला. त्यामुळे त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. गीते यांना आजपर्यंत राज्य, राष्ट्रस्तरीय अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटनेचे त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा कार्य केले असून ते सध्या जामखेड तालुका अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेवानिवृत्त संघटनेने सेवानिवृत्त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी अहिल्यानगर येथील श्री. इथापे गुरुजी यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून एकूण ५८ सेवानिवृत्त शिक्षकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुढील अधिवेशन वर्धा येथे घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंगोली असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मनोहर पोपळाईत व महिला प्रतिनिधी ज्योती देव यांनी केले. हिंगोली चे लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर उपस्थितांना भोजन देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक विभागीय उपाध्यक्ष वसंतराव सबनीस, हिंगोली जिल्हा परिषद असोसिएशनचे पदाधिकारी, औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत, कळमनुरी, हिंगोली तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, गठित केलेल्या सर्व समिती सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा