*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सभोवार जमलेली रसिक मंडळी....त्यांच्यासमोर सादर होणाऱ्या एकाहून एक सरस अशा कविता...आणि त्यांना मिळणारी भरभरून दाद....हे दृश्य कुठल्या महाविद्यालयातील नाही तर चक्क एका जिल्हा परिषद शाळेतील आहे. माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे अभिनव काव्यसंमेलन आयोजित केले होते. यावेळी प्रख्यात निवेदक राजाराम गुजर व प्रसिद्ध कीर्तनकार मोहनानंद महाराज पुरंदावडेकर, वैशाली ओवाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.शाळेतील पदवीधर शिक्षक व साहित्यिक डॉ.प्रेमनाथ रामदासी सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेच्या या अभिनव उपक्रमाची माहिती दिली.शाळेने विद्यार्थ्यांसाठी अगोदर कविता निर्मितीची कार्यशाळा घेतली असून विद्यार्थ्यांना कविता लिहिण्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘उमलती प्रतिभा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कु.आलीया मुलाणी हिच्या ‘बाप’ नावाच्या कवितेने कविसंमेलानास प्रारंभ झाला.
□ जवळ काही नसले तरी
नाही कधी म्हणाले नाही
माझ्या बापापेक्षा दिलदार
मी कुणी पाहिले नाही.
या तिच्या ओळींना उत्स्फूर्त दाद मिळाली.कु.स्वराली तुपे हिने माझी शाळा या कवितेतून शाळेच्या विविध वैशिष्ट्यांचा भावपूर्ण आढावा घेतला.
□ पुस्तकांच्या पानांतून
ज्ञानाचे अमृत मिळते
जीवनाचे सार
सर,तुमच्यामुळेच कळते.
या तिच्या ओळींनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.कु.समीक्षा मोहिते हिने गुरु या विषयावरील कवितेतून जीवनातील गुरुचे महत्त्व अधोरेखित केले. कु.बुद्धमी ओवाळ हिने आई या कवितेतून आईचे शब्दचित्र उभा केले.
□ कशानेच कळू शकत नाही
तिचे स्वरूप आई म्हणजे
देवाचेच दुसरे रूप !
या तिच्या ओळींना उपस्थितांनी दाद दिली.कु.सार्थकी देवकाते, राजरत्न ओवाळ,कार्तिक मोरे व करण मोहिते यांनी आई या कवितेतून आईविषयीच्या भावनांना वाट करून दिली.कु.श्रुती नाळे हिने आपल्या कवितेतून भावाचे महत्त्व मांडले.
□ उदास असला तरी
माझ्यासाठी हसतो
माझा हट्ट पुरविण्यासाठी
माझा भाऊ जीवाचे रान करतो.
या तिच्या ओळी लक्षवेधी ठरल्या.श्रेयस हिवरे या विद्यार्थ्याने स्वत:कडे पाहण्याची एक दृष्टी देणारी कविता सादर केली. रुद्र ओवाळ या विद्यार्थ्याने आईवरील एक सुंदर गीत सादर केले. शाळेतील शिक्षक व कवी डॉ.प्रेमनाथ रामदासी यांनी ‘टिपटूश’ व ‘निवडुंगाचे झाड’ या कविता सादर केल्या.प्रमुख अतिथी मोहनानंद महाराज यांनी आपल्या मनोगतातून भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. कविसंमेलनाचे अध्यक्ष राजाराम गुजर सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे मनभरून कौतुक केले व आपल्या काही रचना सादर केल्या.विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी कु.सार्थकी देवकाते हिने केले. शाळेचे मुख्याध्यापक रमजान शेख सर यांनी आभार मानताना या उपक्रमाबद्दल सर्वांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील उपशिक्षिका स्वाती गायकवाड,श्रद्धा कुलकर्णी व शुभम म्हसवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा