उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
काव्यपुष्पांजली मंडळाच्या वतीने आयोजित माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कार (सन २०२४) वितरण सोहळा, पुस्तक प्रकाशन आणि कविसंमेलन दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. साहित्य, काव्य आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
या सोहळ्यात सुप्रसिद्ध कवी-लेखक हरिश्चंद्र पाटील (नाना) यांच्या “सोन्याचा दगड” व “मामाचा गाव” या कथासंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. याचबरोबर कवी इंद्रजित पाटील यांचा “कळ पोटी आली ओठी” हा काव्यसंग्रह, धनाजी घोरपडे यांचा “जामिनावर सुटलेला काळा घोडा”, रसुल सोलापुरे यांचा “पठारावला दौलती” हा कथासंग्रह तसेच विशाल मोहोड यांची “कीड” ही कादंबरी यांचीही निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
एकूण सहा साहित्यिकांचा आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख मानधन, शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे उत्कृष्ट वाचकांनाही पुरस्कार देण्याची अभिनव संकल्पना या मंडळाने राबवली असून, “लेखकाबरोबर वाचकही तितकाच महत्त्वाचा” हा संदेश त्यांनी अधोरेखित केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगीराज वाघमारे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शिवाजी शिंदे सर, प्रा. डॉ. हमीद आवटे सर, मिस फरीदा आवटे, विजय देशमुख, सोनाजी महाडिक-पाटील, भास्कर बंगाळे, अंकुश गाजरे, संध्या धर्माधिकारी, विमल माळी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांची भाषणे खूपच प्रभावी ठरली . प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांनी " मामाचा गाव" या हरिश्चंद्र पाटील यांच्या कथासंग्रहावर उत्कृष्ट परीक्षण केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात योगीराज वाघमारे सरांनी नव साहित्यिकांना साहित्य लेखना बाबत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. हमीद आवटे यांनी लेखक हरिश्चंद्र पाटील यांच्या सोबतच्या मैत्रीचा गोडवा गायला.
कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रशांत वाघ होते, तर सूत्रसंचालन प्रा. संजय साठे यांनी केले. या कविसंमेलनात किरण निकम, सोमनाथ टकले, दत्ता चव्हाण, श्रेया पाटील, संध्या धर्माधिकारी, फरीदा आवटे, इंद्रजित पाटील, विमल माळी, धनाजी घोरपडे, नूरजहाँ शेख, सुनील अडगळे, विशाल मोहोड, श्रीकृष्ण जगदाळे आदी कवींनी आपल्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे नियोजन व सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी संयोजन समितीतील हरिश्चंद्र पाटील, हमीद आवटे, प्रशांत वाघ व किरण निकम यांनी सर्वांचे आभार मानले.
काव्यपुष्पांजली मंडळाच्या या उपक्रमामुळे नव साहित्यिकांना लेखनासाठी नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून मंडळाच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा