*इंदापूर, डॉ. संदेश शहा*.
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यास सर्वाधिक घरकुले मंजूर झाली आहेत मात्र अनेकांना जागा नसल्यामुळे घरकुल मंजूर होऊन देखील ते बांधता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही कैफियत मांडली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा विषय गांभीर्याने घेत तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे संदर्भात कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी अनेक बेघर कुटुंबांना घरकुले मंजूर झाली आहेत, मात्र त्यांचेकडे स्वतःची जागा नसल्याने सदरची घरकुले अद्यापी प्रलंबित आहेत. त्यामुळे जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून जागेसाठी गायरान, गावठाणातील जागा देणे संदर्भात आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करणेसंदर्भात पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची बुधवार दि. २५ रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गरीब व वंचित कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, हा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे घरकुल मंजूर झालेल्या बेघर कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध होणे गरजेचे असून, ही बाब अत्यंत संवेदनशील असून संबंधित कुटुंबांच्या मूलभूत हक्कांशी निगडित आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या निदर्शनास आणून दिले. समाजातील शेवटच्या गरीब घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे, हे आपले सर्वांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई मिसाळ, सागर मिसाळ हे मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा