Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

*जैन साहित्यिक डॉ. संजीव शहा व बा. ब्र. रेवतीताई दोशी यांच्या ग्रंथांची जयपूर मध्ये हत्तीवरून मिरवणूकीने बहुमान तर डॉ. संजीव शहा यांच्या दुसऱ्या ग्रंथांचे डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन.*

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



सोलापूर येथील जैन साहित्यिक डॉ. संजीव शहा यांनी अनुवादित केलेल्या ' चारित्र चक्रवर्ती ' या युगाचे प्रथमाचार्य, आचार्य शांतीसागर महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित ग्रंथाची जयपूर येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील बा.ब्र. रेवतीताई दोशी यांच्या जैन सिद्धांत ग्रंथ 'धवला' याच्या १५ व्या भागाचा अनुवाद ग्रंथाची देखील जयपूर येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्याचा गौरव उंचावला आहे. यावेळी आचार्य शांतीसागर महाराज, जैन सिद्धांत शास्त्र तसेच जिनवाणीचा जयघोष करण्यात आला.






सोलापूर येथील

डॉ. कोटणीस यांच्या जीवनचरित्रावरील "देवदूत" या कादंबरीचे लेखक डॉ. संजीव शहा ( भंडारकवठेकर ) यांनी जैन साहित्यावर लिहिलेल्या दोन ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. डॉ. संजीव शहा यांनी आचार्य शांतीसागर महाराज यांच्या जीवनावर पंडित सुमेरूचंद्र दिवाकर यांनी लिहिलेल्या "चारित्र चक्रवर्ती" या हिंदी ग्रंथाचा मराठीत केलेला अनुवाद या ग्रंथातून करण्यात आला आहे. सोलापूर येथील जीवराज जैन ग्रंथमाला या भारतातील प्राचीन, सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन महान तपस्वी आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या शुभहस्ते राजस्थान मधील पद्‌मपुरा जयपूर या तीर्थक्षेत्रावर पंचकल्याणक महोत्सव समयी संपन्न झाले. यावेळी जैन सिद्धांत ग्रंथ 'धवला' याच्या १५ व्या भागाचा अनुवाद सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या बा. ब्र. रेवतीताई दोशी यांनी मराठीत केला आहे, त्याचेही विमोचन आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. या

प्रकाशन सोहळ्यापूर्वी  जैन सिद्धांत ग्रंथ 'धवला' व 'चारित्र चक्रवर्ती' या ग्रंथांचे पूजन करून हत्तीवरून धार्मिक ग्रंथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जीवराज जैन ग्रंथमालेचे अध्यक्ष श्रीमान शेठ श्री. अरविंद रावजी दोशी, विश्वस्त अनुप दोशी, संतोषभाई शहा, बा. ब्र. रेवतीताई दोशी, साहित्यिका सौ. ज्योती शहा व अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आचार्य वर्धमानसागर महाराज आशीर्वाद देताना म्हणाले, जैन तत्त्वज्ञानाचा, तीर्थंकर आदिनाथ ते महावीर या २४ तीर्थंकर यांनी प्रतिपादित केलेल्या  अहिंसा तत्त्वांचा प्रचार व प्रसार सर्व देश परदेशात व्हावा, यासाठी मराठी व अन्य स्थानिक भाषांतून त्यांचा अनुवाद होणे ही काळाची गरज आहे.  आचार्य वर्धमानसागर महाराज पुढे म्हणाले,  मोक्षमार्गाकडे वाटचाल करण्यासाठी अशा ग्रंथांचे वाचन, स्वाध्याय सर्वत्र घरोघरी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली प्राचीन परंपरा संवर्धित होऊन युवापिढीवर त्याचे संस्कार होतात.

दिगंबराचार्य प्रज्ञाश्रमण देवनंदीजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील "सर्वोदयी राष्ट्रसंत" या हिंदी भाषेतील एक हजार पृष्ठसंख्या असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते नाशिक जिल्ह्यातील मालसाणे येथील ' णमोकार तीर्थ' या क्षेत्रावरील पंचकल्याणक महोत्सव प्रसंगी संपन्न झाले. 

यावेळी डॉ. मोहन भागवत म्हणाले, आपली भारतीय संस्कृती ही श्रमण आणि ब्राह्मण विचारधारेने बनली असून हिंदुस्थानच्या विकासात जैन धर्माने अनमोल योगदान दिले आहे. यामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर या प्रमुख परंपरा आहेत. प्रभू श्रीराम यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत दिगंबराचार्य देवनंदी महाराज यांच्या णमोकार तीर्थ याने इतिहास निर्माण झाला आहे. त्यांचे जीवनकार्य पुस्तक रूपाने मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न डॉ. संजीव शहा यांनी केला आहे. त्यामुळे भारतीय विचारधारा आणखी प्रगल्भ झाली आहे.

यावेळी पीएचडी गाईड डॉ. रेखा जैन म्हणाल्या, डॉ. संजीव शहा यांचे साहित्य जैन धर्माची प्रभावना करणारे असून ते जैन महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहे. त्यांची लेखनाची क्षमता उत्तम व अनमोल आहे.

यावेळी दिगंबर आचार्य कुंथुसागर महाराज, आचार्य देवनंदीजी, आचार्य गुणधरनंदी महाराज, आचार्य पुष्पदंतसागर महाराज, भक्तांबर वाले आचार्य प्रमाणसागर महाराज, युगल मुनीराज अमोघ कीर्ती आणि अमरकिर्ती महाराज यांच्यासह ३५० हून जास्त दिगंबर आचार्य, मुनीसंघ, आर्यिका माताजी, ब्रह्मचारी पंडीत व विशाल जैन जनसमुदाय उपस्थित होता.

डॉ. संजीव शहा हे सोलापूर येथील जैन साहित्यिक असून त्यांच्या 'देवदूत' या लोकप्रिय कादंबरीचे  राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. या लोकप्रिय कादंबरीला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत समाविष्ट केले असून या कादंबरीचे सोलापूर आकाशवाणी वरून दोन वेळा वाचन झाले आहे. दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचे गत दहा भव हे दशधर्माला कसे अनुसरून आहेत हे त्यांनी कथा रूपातून सुंदर रीतीने दर्शवण्याचा प्रयत्न 'दशधर्मातून पार्श्वप्रभू '

या जीवराज जैन ग्रंथमालेतर्फे प्रकाशित पुस्तकात केला आहे.

डॉ. संजीव यांची भरतेश वैभव, आत्मान्वेशी, पूजा अशी करावी, अर्हत सूत्र ही अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली असून आणखी काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. नवीन पिढीला जैन वाड्मयाची आवड निर्माण व्हावी यासाठी सहज सोप्या शैलीतील त्यांची साहित्य संपदा निश्चितच उपयुक्त ठरणारी आहे. गत चाळीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत राहून जिनवाणीची सेवा करणाऱ्या डॉ. संजीव व त्यांना सहयोग देणाऱ्या धर्मपत्नी सौ. ज्योती शहा, संतोष शहा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तीर्थरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मिहिर गांधी, दिगंबर जैन हुमड फेडरेशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, मधुर मिलन चे अध्यक्ष रमेश शहा वडुजकर, उपाध्यक्ष किरण शहा,  बाबूभई गांधी, नीलमकुमार अजमेरा, सोलापूर येथील आदिनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील गांधी, अनिल जमगे, राजेश फडकुले, रविकुमार शहा पळसदेवकर, सुजाता शहा, उपजिल्हाधिकारी देवदत्त ठोंबरे आदींनी डॉ. संजीव शहा, बा.ब्र. रेवतीताई दोशी यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा