इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर शहरातील युवती व महिला सक्षमीकरण केंद्रबिंदू मानून शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक स्वावलंबन, मनोरंजन, शिक्षण आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मैत्रीण ग्रूप ने रौप्य महोत्सवी वाटचालीचा यशस्वी टप्पा पूर्ण करून आदर्श उभा केला आहे. या ग्रुपची स्थापना अनुराधा प्रदीप गारटकर यांच्या संकल्पनेतून झाली असून स्थापनेपासूनच ग्रुप ने सामाजिक, धार्मिक, आरोग्य विषयक शिबिरे, समुपदेशन, बचत गट, आनंद मेळावा, व्यवसाय प्रशिक्षण, महिला दिन, गौरी सजावट स्पर्धा, महिला-मुलींची मॅरेथॉन, खानाखजाना, वार्षिक सहली, गजानन महाराज पारायण, संगीत रजनी अशा विविध उपक्रमांद्वारे महिलांना सक्षम होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे केवळ चूल आणि मूल यामध्ये व्यस्त असणाऱ्या युवती व महिलांना जगण्याची नवी उमेद मिळून त्या आत्मनिर्भर होण्यास मदत झाली. त्यामुळे पंचवीस वर्षाच्या वाटचालीत प्रथम शेकडो व नंतर हजारो युवती व महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत झाली.
बचत गटाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांचे सबलीकरण झाले, त्यांच्या उत्पादनास बाजारपेठ मिळून त्यांचा प्रपंच सुखी व समाधानी झाला. त्यामुळे धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक जाण आणि सामाजिक जबाबदारीचे भान या सगळ्यांचा संगम म्हणजे ‘मैत्रीण ग्रुप’ होय. जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकत्र करून कार्यरत असलेल्या या ग्रुपचे नाव इंदापूर शहरात अभिमानाने घेतले जात असून त्यामुळे इंदापूर शहराच्या नावलौकिकात चांगलीच भर पडली आहे. या ग्रुप च्या सर्वांगीण प्रगतीसाठी जेष्ठ साहित्यिक कवयित्री श्रीमती प्रतिभा ताई गारटकर उर्फ आक्का तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे नेहमी मार्गदर्शन व सहकार्य मिळते. त्यामुळे हे दोघे या ग्रुपचे आधारवड असून या ग्रुप च्या संस्थापक अध्यक्षा या सर्वांच्या आयडॉल ठरल्या आहेत. या मैत्रीण ग्रूपने जपलेल्या जिव्हाळ्याचा आदर्श तसेच गरुडभरारीचा आदर्श इतर महिला संस्थानी देखील घेणे ही काळाची गरज आहे.
यासंदर्भात मैत्रीण ग्रुप च्या संस्थापक अध्यक्षा सौ. अनुराधाताई गारटकर म्हणाल्या, इंदापूर शहरातील युवती, महिला यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होता यावे, माणुसकीच्या भावनेतून त्यांना आधार देता यावा यासाठी या ग्रुप ची स्थापना केली होती. आज पंचवीस वर्षात आम्हा सर्वांची मैत्री संवर्धित झाली हे आमच्या यशाचे प्रतीक आहे. माझ्या मैत्रिणींनी माझ्या विचारांना नेहमी साथ दिल्याने आमच्या ग्रूप ने पंचवीस वर्ष कसे आनंदात पूर्ण केले हे समजलेच नाही. युवती व महिलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यास आम्ही यशस्वी ठरलो, त्यांच्यावर धार्मिक, सांस्कृतिक संस्कार करण्यास आम्हाला यश आले, त्यांच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी आम्ही आरोग्यविषयक उपक्रम यशस्वी राबवून त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत केली. हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे झाले असून त्याचा मला सार्थ अभिमान आहे. या ग्रुपची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
ग्रुप च्या वाटचालीचे रहस्य सांगताना उमाताई इंगोले म्हणाल्या, “लढ, मी तुझ्याबरोबर आहे असा विश्वास अनुराधाताई नेहमी सर्वांना देतात. त्या सदैव पाठीशी रहात असल्याने हजारो महिला मैत्रीण या सूत्रात एकत्र येऊन संघटित झाल्या. प्रत्येकाच्या सुख दुःखात ताई सोबत असल्याने आमच्या आत्मविश्वासात वाढ झाली. त्यामुळे माझ्या माहेरापासून सासरपर्यंत ‘मैत्रीण ग्रुप’ची सकारात्मक चर्चा होते याचा मला सार्थ अभिमान आहे.
ग्रुपच्या मेघा कुलकर्णी म्हणाल्या, पूर्वी महिलांना घराबाहेर पडणे कठीण होते पण अनुराधाताईंनी डान्स, मेहंदी, रांगोळी, पाककला, धार्मिक कार्यक्रम सुरू केले. त्यामुळे आम्हाला आमची कला दाखविण्यासाठी योग्य वेळी योग्य व्यासपीठ मिळाले. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढून आमचे व्यासपीठ धाडस वाढले. आम्ही बिनधास्त झालो. बचत गटांमधून आम्ही व्यवसाय सुरू केला. आनंद मेळाव्याद्वारे त्याला बाजारपेठही मिळाली. त्यामुळे आमचे सक्षमीकरण होण्यास मदत झाली.
ग्रुपच्या स्मिता पवार म्हणाल्या, वृक्षाला भक्कम बुड असल्या की फांद्या विस्तारतात. आमच्या वटवृक्षाच्या मुळाशी अनुराधाताई आहेत, त्या स्टेजवर नसतात, पण त्या निरंतरपणे पाठीमागून सतत प्रेरणा देतात. महिलांना चुलीपासून समाजात आणण्याचं काम त्यांनी केले आहे. हा ग्रुप माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
ग्रुपच्या हेमा बाब्रस म्हणाल्या, प्रत्येक महिलेत सुप्त गुण असतात. मात्र ते प्रकाशझोतात आणण्याचे काम फक्त या ग्रुप मुळे झाले. स्टेजवर आल्यावर आम्हाला आमची ताकद कळली. आनंद मेळाव्यामुळे गोरगरीब महिलांना रोजगार मिळाला. हाताने बनवलेल्या वस्तू, पदार्थ विकून चार पैशांचा फायदा झाला. या उपक्रमामुळे महिलांना आत्मविश्वास मिळून त्या आत्मनिर्भर होण्यास मदत झाली.
ग्रुपच्या रेखा जोशी म्हणाल्या, मैत्रीण ग्रुपने मनोरंजनाबरोबरच सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबवले. कोरोना महामारीत अन्नधान्य वाटप, चर्मकार बांधवांना छत्र्या वाटप असे अभिनव उपक्रम राबविले. धार्मिक सहली, विरंगुळ्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते. त्यामुळे आम्हा सर्वांना ऊर्जा मिळते. प्रदीप गारटकर यांचे आम्हाला नेहमी सहकार्य लाभले आहे.”
रसिका देशपांडे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून गजानन महाराजांचे पारायण सातत्याने होत आहे. धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजन व सामाजिक उपक्रम आमच्या ग्रुपने राबवले. पंचवीस वर्षांचा हा प्रवास आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा