Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ मार्च, २०२६

*भारतीय मिलेट ही संपूर्ण जगाला आरोग्यासाठी दिलेली देणगी : डॉ. विकास ओझर्डेकर. इंदापूरात जागतिक महिला दिनानिमित्त मान्यवर महिलांचा गौरव, महिला आरोग्य व सौंदर्य व्याख्यानास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



किंमतीला स्वस्त, गुणाला मस्त तसेच शरीरातील विविध आजारांना नष्ट करणारे भरडधान्य उर्फ मिलेट हे संपूर्ण जगाला मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी वरदान आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी याचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन पुणे येथील डॉ. विकास ओझर्डेकर यांनी केले.

इंदापूर येथील आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टच्या सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा, विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या सभागृहात 'महिलांचे सौंदर्य आणि आरोग्य संवर्धन' या विषयावर आयोजित  मोफत व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानच्या संचालिका स्वर्गीय डॉ. राधिका संदेश शहा यांच्या पुण्यस्मृती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली


कार्यक्रमाचे उद्घाटक, ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर व अध्यक्ष सौ. कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य भीमराव वणवे यांच्या हस्ते स्व. डॉ. राधिका शहा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.  

डॉ. विकास ओझर्डेकर पुढे म्हणाले, डॉ. खादर वली यांनी विकसित केलेली मिलेट थेरपी ही  कॅन्सर, मधुमेह, लकवा, सांधेदुखी, थायरॉईड यासारखे  विविध आजार रोखण्यासाठी तसेच ते बरे करण्यासाठी उपयुक्त आहे.

ब्ल्यू जय कंपनीचे राज्यातील प्रथम विपणन प्रमुख प्रवीण जाधव यांनी 'स्वयंपाक घरातून आरोग्य संवर्धन' या विषयावर प्रबोधन केले. भांड्यातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी त्यांनी शास्त्रोक्त भांडी स्वयंपाक करताना वापरली पाहिजेत असे सांगितले.

अकलूज येथील डॉ. संतोष काटकर यांनी महिलांच्या सौंदर्याचे संवर्धन करण्यासाठी भारतीय आयुर्वेद ही गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. 


आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी आजार होण्यापेक्षा त्यास प्रतिबंध करणे महत्त्वाचे असल्याने महिलांनी चाळीस वर्षानंतर नियमित तपासणी करावी असे सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा, मैत्रीण ग्रुप च्या उमा इंगुले, सकाळ तनिष्का तालुका समन्वयक सारिका पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता  शहा, 'मैत्रीण ग्रुप'च्या संस्थापिका सौ. अनुराधा गारटकर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंदापूरच्या माजी अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे, लिनेस क्लबच्या अध्यक्षा सौ. उज्वला गायकवाड, महिला बचत गटासाठी कार्यरत असणाऱ्या सौ. निलोफर रज्जाक पठाण, 'सकाळ तनिष्का'च्या तालुका समन्वयक सौ. सारिका पवार आणि सौ. अश्विनी गुजर यांचा समाजसेवी कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध आरोग्यदायी प्रात्यक्षिके  सादर करून महिलांना घरबसल्या स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य कसे जपावे व त्यातून अर्थार्जन कसे करावे, याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदेश शहा यांनी तर सूत्रसंचालन श्रद्धा पवार हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक जगताप, अमोल राऊत, सागर कांबळे, केदार गोसावी, आदिक इंगळे, पृथ्वीराज चव्हाण, त्रिशला पाटील यांनी प्रयत्न केले. 

चौकट : डॉ. राधिका शहा यांचे दि.१२ जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे अवयवदान केल्याने पाच जणांना जीवदान मिळाले. त्यांच्या निधनाचे दुःख विसरून शहा परिवाराने महिलांचे आरोग्य संवर्धन करण्यासाठी स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम राबविला असल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव वणवे सर यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा